मुंबई, दि. १३ : नवी मुंबई विमानतळास स्थानिक जनतेच्या मागणीनुसार लोकनेते दि. बा. पाटील यांचे तर मालवणमधील चीपी विमानतळास दिवंगत संसदपटू आणि समाजवादी नेते बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी जनता दल (से) महाराष्ट्र पक्ष व कोकण जनविकास समितीने केली आहे.
गेले काही दिवस नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणारे लोकनेते आणि दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळास देण्याबाबत स्थानिक जनतेचे आंदोलन सुरू आहे. या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा शिवसेनेचा मानस असल्याचा व तशी भावना पक्षाचे एक नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालेले असल्यामुळे अशी इच्छा बाळगण्यात काही गैर नाही.
परंतु, शिवसेनाप्रमुख हे राष्ट्रीय पातळीवरचे आणि साऱ्या राज्यात ओळख असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक राज्यात कुठेही करता येऊ शकते. मात्र, दि. बा. पाटील आणि बॅ. नाथ पै ही दोन नावे अनुक्रमे नवी मुंबई परिसर, रायगड जिल्हा तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व राजापूर लोकसभा मतदारसंघाशी जोडलेली आहेत. नवी मुंबईच्या निर्मितीमुळे विस्थापित झालेल्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी मोठा संघर्ष केला होता. या परिसरातील ते एक मोठे नाव आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळास त्यांचेच नाव देणे योग्य होईल.
त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळास कोकणचे सुपुत्र, राजापूर लोकसभा मतदारसंघातील घराघरात “आमचो नाथ” अशी ओळख असलेले आणि ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू लोकसभा सभागृहात येऊन बसत त्या बॅ. नाथ पै यांचे नाव द्यावे, अशी विनंती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, प्रधान महासचिव प्रताप होगाडे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रदेश उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई कार्याध्यक्ष सलीम भाटी, नवी मुंबई अध्यक्ष कर्नल रानडे, रायगड उपाध्यक्ष विजय खारकर तसेच कोकण जनविकास समितीचे जगदिश नलावडे, सुरेश रासम, प्रकाश लवेकर, विद्याधर ठाकूर, धनाजी सुरोसे, केतन कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
बॅरिस्टर नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ २५ सप्टेंबर, २०२१ रोजी होत असून या पार्श्वभूमीवर चिपी विमानतळाला त्यांचे नाव दिल्यास राज्यातील जनतेने दिलेली ही आदरांजलीच ठरेल. बॅ. नाथ पै यांचा जन्म वेंगुर्ल्यात झालेला असून वयाच्या केवळ १७व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. गोवा मुक्ती आंदोलनात तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही ते हिरीरीने सहभागी झाले होते. बेळगाव आणि अन्य सीमाप्रदेशाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा या मागणीचे संसदेतील ते सर्वात खंदे प्रवक्ते होते. बॅ. नाथ पै यांची गणना भारतीय संसदेच्या इतिहासातील मोजक्या उत्कृष्ट संसदपटुंमध्ये होते. अलौकिक बुद्धिमत्ता, सखोल अभ्यास, असामान्य वक्तृत्व आणि निर्विवाद सचोटी अशा गुणांमुळे पक्षीय भेदापलिकडे ते सार्वत्रिक आदराला पात्र होते.
अशा या संसदपटूचे योग्य स्मारक होणे आवश्यक आहे. मालवणमधील चीपी विमानतळ हा त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या राजापूर लोकसभा मतदारसंघातच (आताचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग) येत असल्याने त्याला बॅ. नाथ पै यांचे नाव देणेच उचित होईल. त्यामुळे या दोन्ही मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी विनंती या सर्वांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.















