मुंबई, (निसार अली) : चारकोपमधील म्हाडा वसाहतीत राहणारे गिटारिस्ट लाल्टू दादा यांचे हृद्याच्या तीव्र धक्क्याने सोमवारी(ता.६) निधन झाले. एका ख़ासगी कार्यक्रमासाठी ते औरंगाबाद येथे गेले होते. याचवेळी गिटार वाजवत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना हृद्याचा तीव्र झटका येऊन ते स्टेजवरून कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. डहाणूकर वाड़ी हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका हरहुन्नरी कलावंतास आपण मुकलो, अशी भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली. लाल्टू हे मूळचे नेपाळी नागरिक होते. अनेक हिंदी चित्रपट आणि स्टेज शो मध्ये गिटार वाजवून त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले होते.