रत्नागिरी : सातारा जिल्ह्यातील कराड क्षेत्रात कोरोना विषाणूचा फैलाव अधिक प्रमाणात असल्याने 2 मे 2020 पर्यंत या भागातून येणाऱ्या भाजीपाला व इतर साहित्याच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा कोरोना संदर्भातील इंन्सिंडंट कमांडर यांनी हा आदेश जारी केला आहे.
या आदेशात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी पुढील आदेश होईपर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 लागू केलेला आहे. त्यानंतर 19 एप्रिल 2020 च्या आदेशाने काही आस्थापनांना सूट देण्याबाबत सुधारित आदेश पारित केलेले आहेत.
मुख्य सचिव महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन महाराष्ट्र शासन यांचेकडील 15 एप्रिल 2020 च्या अधिसूचनेनुसार लॉकडाऊन कालावधी 03 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण असल्याने संपूर्ण कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका क्षेत्र, जखीनवाडी ग्रामपंचायत क्षेत्र, नांदलापूर ग्रामपंचायत क्षेत्र, गोळेश्वर ग्रामपंचायत क्षेत्र, कार्वे ग्रामपंचायत क्षेत्र, कापिल ग्रामपंचायत क्षेत्र, सैदापूर ग्रामपंचायत क्षेत्र, बनवडी ग्रामपंचायत क्षेत्र, गोटे ग्रामपंचायत क्षेत्र, वारुंजी ग्रामपंचायत क्षेत्र, मुंढे ग्रामपंचायत क्षेत्र व कोयना वसाहत ग्रामपंचायत क्षेत्र हे कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव नियंत्रणात ठेवणेचे अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सदर नमूद क्षेत्रामध्ये जिल्हादंडाधिकारी सातारा यांचेकडून क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 चे तरतुदीनुसार मनाई आदेश लागू केलेला आहे.
रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांची हद्द चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट चेकपोस्ट ही असून त्या चेकपोस्ट पासून पुढे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याची हद्द सुरु होते. या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर कुंभार्ली चेकपोस्ट बसविण्यात आलेला आहे. चिपळूण तालुक्यातील भाजीपाला, अन्नधान्य, अंडी, चिकन, मटण तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक कराड, पाटण, मलकापूर या भागातून दररोज होत आहे. कराड, पाटण भागातून येणारी वाहने कुंभार्ली चेकपोस्ट वरुन भाजीपाला-107, कांदा-30, लोटे कंपनी-76, ॲम्ब्युलन्स 3, ई पास/परवानगी 04, पेट्रोल डिझेल गॅस 37, दूध 100, फळे 38, सिमेंट 14, कोंबडी 10, अंडी 23, रिकाम्या गाड्या 65, इतर गाड्या 103 अशी एकूण 610 वाहने वाहतूक करताना आढळून आली असून त्यामधून एकूण 974 व्यक्ती आढळून आलेल्या आहेत.
कराड, पाटण व लगतच्या भागामध्ये दररोज कोरोना विषाणूचे रुगण वाढत असल्याने व त्याच भागातून चिपळूण व लगतच्या तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा दैनंदिन होत असल्याने कोरोना विषाणूचा फैलाव अशा वाहनांमधून व व्यक्तींद्वारे चिपळूण अगर लगतच्या तालुक्यात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यात प्रशासनाला निश्चितच यश प्राप्त झालेले आहे. परंतु सातारा जिल्ह्यातून वाहतूक सुरु राहिल्यास व त्यामधून लोकांची ये-जा होत असल्याने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणे प्रशासनाला भविष्यात अडचणीचे व जिकीरीचे होवू नये म्हणून कुंभार्ली चेकपोस्ट वरुन भाजीपाला, अंडी, चिकन, मटण यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी करण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी आदेश पारित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कोरोना विषाणूचा दैनंदिन होणारा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता त्याचा फैलाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अगर चिपळूण तालुक्याच्या लगतच्या भागला होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर चिपळूण यांनी 29 एप्रिल 2020 रोजी सकाळी 6.00 वाजल्यापासून ते 02 मे 2020 रोजी सकाळी 6.00 वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली चेकपोस्ट वरुन चिपळूणकडे भाजीपाला, फळे, अंडी, कोंबड्या, शेळी, मेंढ्या, बोकड यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांस पूर्णपणे बंदी करण्यात येत आहे. पोलीस विभागने त्यांचेशी निगडीत बाबींच्या अनुषंगाने सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
सदर आदेशाची पालन न करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भा.द.वि. 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.