मुंबई : घाटकोपर ते भांडूप पश्चिमेतील जनतेसाठी जनता दल सेक्युलर सरसावले असून पाणीप्रश्नाबाबत आक्रमक झाले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, महासचिव प्रशांत गायकवाड, ईशान्य मुंबई अध्यक्ष संजीवकुमार सदानंद यांनी दिली आहे.
ऐन पावसाळ्यात घाटकोपर ते भांडूप पश्चिम परिसरात गेले चार दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे या परिसरातील जनतेचे प्रचंड हाल सुरू आहेत. नागरिकांना पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची जबाबदारी असली तरी सध्या पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती म्हणजे अप्रत्यक्षरीत्या राज्य सरकारच्या हाती आहे, असे प्रभाकर नारकर यांनी सांगितले.
जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे खरे असले तरी चार-चार दिवस जलवाहिनी दुरुस्त होऊ शकत नाही हे आश्चर्यकारक आणि अक्षम्य आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत याचा फायदा घेऊन प्रशासन एकप्रकारे जनतेस वेठीस धरीत आहे. मुंबईत नदी, नाले, विहिरी नाहीत की ज्या आधारे लोक पाण्याची गरज भागवू शकतील. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत होत नसेल तर टँकरमार्फत मोफत पाणीपुरवठा करणे ही पालिकेची जबाबदारी आहे, याकडे नारकर यांनी लक्ष वेधले.
तरी तातडीने पालिका आयुक्त, तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून चार दिवस झाले तरी पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही, याची विचारणा करावी आणि तातडीने आवश्यक ती उपाययोजना योजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत.
त्याचबरोबर निष्काळजीपणा व कामातील कुचराईबद्दल जबाबदार कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नारकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.