वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावरील नवीन उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण संपन्न
Mumbai : वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे प्रवासातील अनावश्यक वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उपयुक्त आणि जनहिताचा आहे. जनहिताचे प्रकल्प उभारण्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हातखंडा असून त्याबद्दल एक मुंबईकर म्हणून महानगरपालिकेचा मला नेहमी अभिमान वाटतो, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रशंसा केली. महानगरपालिकेला आवश्यक ते सर्व सहकार्य आणि पाठबळ राज्य शासनाकडून दिले जाईल, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वीरमाता जिजाबाई भोसले मार्ग (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) वर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज (दिनांक १ ऑगस्ट २०२१) दुपारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, अल्पसंख्याक मंत्री श्री. नवाब मलिक, मुंबईच्या महापौर तथा कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, खासदार श्री. मनोज कोटक, खासदार श्री. राहुल शेवाळे, आमदार तथा स. प. नेता श्री. रईस शेख, महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
महानगरपालिकेचे स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष श्री. स्वप्नील टेंबवलकर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा श्रीमती राजूल पटेल, एम/पूर्व प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. विठ्ठल लोकरे, स्थानिक नगरसेविका श्रीमती आयेशा खान तसेच प्रभागातील इतर नगरसेवक यांच्यासह उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. राजेंद्रकुमार तळकर, परिमंडळीय उपआयुक्त श्री. भारत मराठे, प्रमुख अभियंता (पूल) श्री. सतीश ठोसर यांच्यासह विविध मान्यवर या लोकार्पण प्रसंगी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून उपयुक्त आणि आखीव-रेखीव अशी विकासकामे करणे आवश्यक असते. घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाने प्रवासातला वेळ वाचण्याचा विचार केला तसा पुलाच्या आजुबाजूच्या वसाहतींना चांगली घरे देण्यासाठी देखील विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. जनतेचं सहकार्य असेल तर चांगली विकासकामे निश्चित होतात. जनहिताची कामे करण्यासाठीच जनता लोकप्रतिनिधींना निवडून देत असते. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाचे कामही वेगात सुरु आहे. कोविड संसर्गाच्या स्थितीतून सावरुन, नैसर्गिक आपत्तींचा सामना करुनही राज्यात विकास कामांनी वेग धरला आहे, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी नमूद केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनहिताच्या प्रकल्पांमध्ये राज्य शासन पाठबळ देईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.
नवीन उड्डाणपुलाची ठळक वैशिष्ट्येः-
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता हा शीव (सायन) – पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या दोहोंना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुज-चेंबूर जोडरस्ता तसेच पूर्व मुक्त मार्गावरुन येणाऱया वाहनांमुळे नेहमी वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता. त्यावर उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने हा सुमारे ३ किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. सदर उड्डाणपूल हा शिवाजी नगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील नगर हे चार महत्त्वाचे जंक्शन त्यासोबत देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी. एम. जी. पी. नाला अशा ३ मोठ्या नाल्यांवरुन जातो.
पुलाची एकूण लांबी २.९९१ किलोमीटर तर रुंदी २४.२ मीटर इतकी आहे. उत्तर वाहिनी ३ व दक्षिण वाहिनी ३ अशा एकूण ६ मार्गिका या पुलावर आहेत. या उड्डाणपुलाचे बांधकाम खंडजोड (सेगमेंट) तंत्रज्ञानाने व एकल स्तंभ पद्धतीने केलेले असल्याने पुलाखालील रस्त्याच्या मार्गिका देखील वाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या उड्डाणपुलासाठी प्रथमतःच अखंड पद्धतीने २४.२ मीटर लांबीचा सेगमेंट तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
पुलाच्या निर्मितीसाठी लागलेल्या साहित्याचा विचार करता एकूण १ लाख ०२ हजार २२५ घनमीटर काँक्रिट, १७ हजार १७५ मेट्रिक टन लोखंड (रेनफोर्समेंट स्टील), ४ हजार ४८६ मेट्रिक टन संरचनात्मक लोखंड (स्ट्रक्चरल स्टील), १ हजार मेट्रिक टन एच.टी. स्ट्रॅण्ड, ५८६ नग बेअरिंग्स आणि १० हजार ३६२ मेट्रिक टन डांबर मिश्रण वापरात आले आहे.