मुंबई : शिवजयंती उत्सव समिती घाटकोपरच्या ३८ व्या शिवजयंती सोहळ्यास १३ मार्चपासून सुरुवात झाली. सोमवारी शिवनेरी किल्ला, जुन्नर ते घाटकोपर असा प्रवास करत शिवज्योत मुंबईत दाखल झाली. या सोहळ्यात प्रथमच महिला आणि तरुणी सहभागी झाल्या. शिवज्योतीची (ता. १५ मार्च) तिथीनुसार शिवजयंती उत्सवात पारंपरिक पद्धतीने सकाळी ९ वाजता शिवरथयात्रा काढण्यात येईल. घाटकोपर येथील पारशीवाडी विभागात मिरवणुकीला सुरुवात होईल. यानंतर भटवाडी, घाटकोपर स्थानक परिसरातून अमृत नगर सर्कल येथे ती दुपारी ३ वाजता समाप्त होईल. या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त येतील, असे उत्सव समितीचे अध्यक्ष कल्पेश शेलार यांनी सांगितले.
शिवज्योतच्या प्रवासात जुन्नर आणि मुंबईतील अनेक मान्यवर नागरिकांनी सहभाग घेतला. पोलीस सहाय्यक आयुक्त भीमदेव राठोड यांनी पहाटेच्या सुमारास शिवज्योत हातात घेऊन तरुणांना प्रोत्साहन दिले. जुन्नर येथे समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक किरण लांडगे यांनी शिवज्योत पूजन करून यात्रेला सुरवात केली. पुणे जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके शिवसेना जुन्नर तालूका प्रमुख माउली खंडागळे ,जुन्नरचे नगर अध्यक्ष श्याम पांडे जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारेख आदींनीही यात भाग घेतला.