मुंबई: घाटकोपर मधील सर्वोदय रूग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळलंय.. चार्टर्ड विमान कोसळल्याने मोठा आवाज झाला, त्यामुळे परिसरात आगीचे लोट पसरले आहेत. आचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रथम हा आवाज नक्की कुठून आला हे नागरिकांना कळत नव्हते. या विमानातील वैमानिकासह चार जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली.सर्वोदय रूग्णालयाशेजारील काम चालू असलेल्या जागृती इमारतीवर हे विमान कोसळले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अग्निशामन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.या गजबलेल्या भागात इतरत्र कुठेही विमान कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती. मात्र, विमानाच्या महिला पायलट मारिया यांच्या प्रसंगावधानाने हा मोठा अनर्थ टळला. त्यांनी स्वतःचा जीव गमावला मात्र, अनेकांचे प्राण वाचवले.घाटकोपरचा संपूर्ण भाग हा खूपच दाट लोकवस्तीचा असल्याने विमान क्रॅश झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकली असती. मात्र, कन्स्ट्रक्शन साईटजवळील जागा मोकळी असल्याने पायलटने विचारपूर्वक निर्णय घेतल्याने ही जीवितहानी होऊ शकली नाही. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्याच्या बाजूला दाट लोकवस्तीचा परिसर असून एक महाविद्यालयही आहे.विमानात पायलट कॅप्टन मारिया, सहपायलट कॅप्टन प्रदीप राजपूत तसेच इंजिनिअर सुरभी आणि टेक्निशिअन मनिष पांडे असे चार जण या विमानातून प्रवास करीत होते. विमान क्रॅश झाल्यानंतर या चौघांचाही मृत्यू झाला आहे. तसेच एका पादचाऱ्याचाही या अपघातात मृत्यू झाला.तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. डीजीसीएचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले असून हे पथक अपघात कसा झाला, अपघाताचे कारण आणि विमानात काही त्रुटी होत्या का, या सर्व बाबींचा तपास करणार आहे.