ठाणे : फुले, फुलपाखरे यांच्यावर निसर्गाने सढळ हस्ते निरनिराळ्या रंगांची उधळण केली आहे. या रंगामुळेच त्यांचे रुप खुलून दिसते. ज्येष्ठ छायाचित्रकार चंद्रकांत घाटगे आणि त्यांचा पुत्र अभिजीत घाटगे यांनी हीच विविध रुपे कॅमेरातून टिपून निसर्गसौंदर्य उलगडून दाखविले आहे. त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन कापूरबावडी येथील ठाणे महानगरपालिकेचे कलाभवन, येथे भरविण्यात आले आहे. २ एप्रिलपर्यंत ते सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत निसर्गप्रेमींसाठी सुरू असणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन ३० मार्चला झाले. ३१ तारखेपासून प्रदर्शनाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवसापासून निसर्गप्रेमी नागरिकांचा प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शनात विविध रंगांची फुलपाखरे, फुले यांची मनमोहून टाकणारी छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत.
चंद्रकांत घाटगे हे भांडूप येथील रहिवासी आहेत. मुंबई महानगर पालिकेत असिस्टंट असेसर अँड कलेक्टर या पदावरून ते निवृत्त झाले आहेत. अनेक राष्ट्रीय़ आणि आंतराष्ट्रीय़ छायाचित्र प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला आहे. रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील कुडूक खुर्द हे त्यांचे मूळ गाव आहे.