रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): पावस परिसरात घरफोड्या करून दहशत पसरवणारा अट्टल चोरटा पूर्णगड पोलिसांच्या हाती सापडला आहे. रविवारी मध्यरात्री पिकअप शेडमध्ये लपुन बसलेला असताना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले.
पोलीस नाईक अरविंद अर्जुन कांबळे यांनी याबाबतची खबर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात दिली. विठलादेवी एसटी पिकअप शेडमध्ये लपुन बसलेला असताना पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांची रात्र गस्त सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान पावस परिसरातील घरफोड्यांच्या संख्येत वाढ झाली होती. पावस येथे आठ घरफोड्या झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पकडलेल्या संशयित चोरटयाकडून टीव्ही, मोबाईल, आयफोन, कॉम्प्युटर यासारख्या किंमती वस्तु असा ४८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.