रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)- चिपळूणमध्ये ५ जुलै रोजी दिवसा घरफोडी करून पोबारा करणाऱ्या ४ जणांच्या टोळीचा चिपळूण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रायगड जिल्ह्यातील पेण येथे मुसक्या आवळल्या. एक होंडासिटी कारसह सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ८ लाख १८ हजार ३७० रूपये किंमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त केला. दरम्यान, चिपळूणसह भिवंडी ते आंबाडी या परिसरामध्ये देखील घरफोडी केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
चिपळूण तालुक्यात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. ५ जुलै रोजी दिवसाढवळ्या दिवसा घरफोडी करून, चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. चिपळूणसह खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या प्रकरणात वाढ झाल्याने, या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दोन पोलीस पथके तयार करून, गुन्हे उघडकीस येण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले़ चिपळूण परिसरात घडलेल्या घरफ ोडीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोनि शिरीष सासने यांनी एक पथक रायगड, ठाणे, मुंबई या परिसरात पाठवले़ या चोरी प्रकरणात चोरट्याने काळ्या रंगाची होंडासिटी गाडी वापरली असून, त्या गाडीचा नंबर एमएच ०१ ने सुरू होत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते़ या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रायगड जिल्ह्यातील पेण येथील हॉटेल हिमगौरी येथील मोकळ्या जागेत एक काळ्या रंगाची होंडासिटी (एमएच ०१ एएच ५८६४) निदर्शनास आली. पोलीस पथकाने या वाहनातील चौघांची झडती घेतली असता, पोलिसांना ड्रायव्हर सिटच्या खाली स्क्रू ड्रायव्हर, ॲडजेस्टेबल पाना, कटावणी यासह एका स्टीलच्या डब्यात सोन्याचे दागिने मिळून आले़ याबाबत अधिक चौकशी केली असता, संशयितांनी चिपळूण येथील घरफ ोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली़ पोलिसांनी याप्रकरणी ज्ञानेश्वर अप्पादुराई शेट्टी (३५, रा़ दिवा, ठाणे, मूळ रा़ तामिळनाडू), नासीर खान इसाक खान पठाण (३९, रा़जालना), मुकेश भागोजी बाळसराफ (३४, रा़ कल्याण, ठाणे, मुळ रा़ जुन्नर, पुणे), रवी रामचंद्र शेट्टीयार (३४, रा़ ठाणे, मुळ रा़ तामिळनाडू) यांना अटक केली़
पोलिसांनी आरोपींकडून होंडासिटी कारसह १ सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, २ पेंडल, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ८ लाख १८ हजार ३७० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़ यापैकी जप्त केलेले दागिने हे आरोपीने भिवंडी ते आंबाडी या परिसरात दिवसा घरफोडी, चोरी प्रकरणातील असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या टोळीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणी गुन्हे केल्याची शक्यता असून, रत्नागिरी जिल्ह्यातील चोरीबाबत अधिक तपास सुरू आहे़ पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सपोफो सुभाष माने, पोहेकॉ संजय कांबळे, राकेश बागुल, दिनेश आखाडे, उदय वाजे, विजय आंबेकर, रमिज शेख, चालक दत्ता कांबळे यांनी सहभाग घेतला.

















