
घरडा केमिकल उत्पादक कंपनीच्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये आज एक दुर्घटना घडली, यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक कामगार गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती समजतात रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच कंपनी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.
दरम्यान या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येतील, तसेच जखमी असणाऱ्या कामगाराच्या उपचारासाठी वीस लाख रुपये कंपनी देणार असल्याचं घरडा केमिकल्स तर्फे सांगण्यात आल्याचं मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने जाहीर केला आहे. सोबतच या ठिकाणी पोलीस यंत्रणा आपले वेगळे नियंत्रण कक्ष सुरू करेल.
हा सर्व औद्योगिक परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली यापुढील काळात राहील याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यास सोबतच त्यांना रोजगार मिळण्याच्या बाबत कार्यवाही करण्यात येईल.
या दुर्दैवी घटनेची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून पालकमंत्री श्री अनिल परब यांनीही याबाबत माहिती घेतली.