डोंबिवली : घरामध्ये शिरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सापाला घरात शिरण्याआधीच सर्पमित्राने पकडल्याने कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कल्याण पश्चिमेतील राममारुती महाराज मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला.
या परिसरात राहणाऱ्या योगेश राजे यांना एक साप बाहेरील दरवाजातून घरात जायचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. या सापाला पाहताच त्यांची भितीने गाळण उडाली. मात्र सुदैवाने घरामध्ये त्यावेळी कोणीही नसल्याने घराचा दरवाजा बंदच होता म्हणून सापाला घरात शिरता येत नव्हते. याबाबत योगेश राजे यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आशिर्वाद कर्णिक यांना सांगितले. त्यावरून आशिर्वाद कर्णिक यांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्पमित्र दत्ता बोंबे यांना ही माहिती दिली. सर्पमित्र बोंबे यांनीही लगेच संबंधित ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी हा साप घराच्या दरवाजा आणि उंबरठ्याच्या फटीत बसून राहिला होता. सर्पमित्र बोंबे यांनी त्याला अवघ्या काही मिनिटातच पकडून नेल्याने राजे कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला. धामण जातीचा हा साप असल्याचे बोंबे यांनी सांगितले.