
मुंबई, (निसार अली) : कोरोना या घातक विषाणूविरोधात सामना करण्यासाठी घरातच राहून रमजान साजरा करा, असे आवाहन मुस्लिम समाजातील मान्यवरांनी केले आहे. उद्यापासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे.
रमजानाच्या महिन्यामध्ये रोजे, नमाज, जकात आदी सर्व मुस्लिम बांधव अत्यंत विनम्रतेने करत असतात. संपूर्ण जगामध्ये व भारतात कोरोना या आजाराने मोठे आक्रमण केले आहे. या आजारामुळे आतापर्यंत असंख्य लोकांचे मृत्यू झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कोरोना हा आजार माणसांच्या संपर्कात आल्यानंतर स्पर्शातून मोठ्या प्रमाणावर होतो असे दिसून आलेले आहे. म्हणून, आपल्याला माणुसकी न सोडता माणसा-माणसांमध्ये अंतर ठेवावे लागणार आहे. हे अंतर मनाचे नाहीतर शरीराचे ठेवणे गरजेचे आहे.
या साठी मुंबई सह महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम तरुणतरुणीसह समाजातील मान्यवरांनी पत्रका द्वारे सर्व भारतीय मुस्लिम बांधवांना असे आवाहन केले आहे कि, रमजानच्या काळात सर्वांनी घरातच राहावे. रोजे, जकात व नमाज अदा करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. सोसायटीच्या टेरेसवर मशिदीत एकत्र नमाज पडण्याचा आग्रह कृपया धरू नका. कारण यामुळे हा आजार पसरू शकतो. आपण अनेकदा प्रवासात जमेल त्याठिकाणी नमाज पढतो, परमेश्वराचे चिंतन मनात केले तरी परमेश्वराला ते मान्य आहे, म्हणून घरात राहून परमेश्वराला आठवा, चिंतन करा. घरी रहा, सुरक्षित रहा, असे सांगण्यात आले आहे.
आपल्या एका कृतीने समाजामध्ये कोरोना विषाणू पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घरातच राहून अल्लाह चे चिंतन करावे लागणार आहे. आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला माणूस हा खूप महत्त्वाचा आहे, आम्ही आपणास राष्ट्र सेवा दलाच्या वतीने व आमच्या वतीने नम्र विनंती करतो की, आपण आमच्या आवाहनाचे पालन करावे, अशी विनंती अल्लाउद्दीन शेख,राष्ट्रीय सचिव, राष्ट्र सेवा दल, निसार अली, मालवणी-मालाड, शहनाज मोमीन, ताहिर शेख, इचलकरंजी आसिफ कलायगार, शब्बीर शिरोळे, जैद मुजावर, जावेद मोमीन, इस्माईल समडोळे, फैसल शेख, मालाड. फारूक अली सय्यद, नासिर सय्यद, रुबिना खान, अय्याज नाईकवडी, मिरज, नासीर शरीकमसलत, मिरज, नुरा शेख, धुळे, नजीर शेख, औरंगाबाद,रईस मिर्झा, औरंगाबाद,समीर पठाण, अहमदनगर, अमन शेख, चेन्नई,रझिया शेख, पनवेल यांनी केली आहे.















