बंद पडलेली नाट्य स्पर्धा पुन्हा सुरु होण्यासाठी आमदारांसह नगराध्यक्षांचा पुढाकार
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी नगर परिषद प्रायोजित आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने नटवर्य कै. शंकर घाणेकर स्मृती करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहूल पंडित यांनी पत्रकार परिषदेमध्ये हि माहिती दिली. यावेळी आ. उदय सामंत हेही उपस्थित होते.
17 ते 19 जानेवारी 2018 अशी तीन दिवस स्वा. वि.दा. सावरकर नाट्यगृहात ही स्पर्धा होणार आहे. 2013 सालापासून या स्पर्धा बंद होत्या. पण आता या स्पर्धा पुन्हा सुरु होण्यासाठी आमदार उदय सामंत यांच्यासह आपण स्वतः पुढाकार घेतला असल्याची माहिती यावेळी नागराध्यक्षांनी यावेळी दिली.
मागील दोन वर्षे ज्यांनी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन पहिल्या तीन क्रमांकांचे पारितोषिक ज्यांनी पटकावले आहे, त्यांना या स्पर्धेत प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एकांकिकांसाठी पहिल्या क्रमांकाला २५ हजार रूपये, शिल्ड व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला रू. १५ हजार, शिल्ड व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला रू.१० हजार, शिल्ड व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ एकांकिकाला ७ हजार रूपये, शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट पार्श्वसंगीत, उत्कृष्ट प्रकाशयोजना, उत्कृष्ट लेखन अशी विविध पारितोषिके देण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका पोस्टाद्वारे किंवा संपर्क साधून स्पर्धाप्रमुख विजय साळवी किंवा शाम मगदूम यांच्याशी संपर्क साधून द्याव्यात. प्रवेशिका ३० डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येतील. तरी जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.