मुंबई : राज्यात जेनेरिक औषधांची केंद्रे अधिकाधिक संख्येने सुरु करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. आगामी काळात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यावर भर राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यभरात जेनेरिक औषधांची केंद्रे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु असून शासनाच्या विविध रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यावर भर देणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकानयन आणि रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार एकनाथराव खडसे आदी उपस्थित होते.
जेनेरिक औषधे स्वस्त आणि किफायतशीर असल्याने याचा फायदा अधिकाधिक रुग्णांना व्हावा यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मांडविया यांनी यावेळी सांगितले. केंद्र शासन राज्यांच्या सहकार्याने जेनेरिक औषधांची केंद्रे वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असून येत्या तीन वर्षात प्रत्येक तालुकास्तरापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
जेनेरिक औषधे मधुमेह, हृदयविकार, कर्करोग आदी विकारांवर उपयुक्त असल्याने त्याचा सर्वसामान्यांना निश्चितच लाभ होईल. आगामी काळात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितल्यानुसार प्रत्येक रेल्वे स्थानकावर औषधे मिळतील, असेही मांडविया यांनी यावेळी सांगितले.