रत्नागिरी. 3 मे : परप्रांतीय मजुरांना गावी जाण्यास आता परवानगी दिली जात आहे. काही ट्रेन देखील त्याप्रमाणे सोडण्यात आल्याने त्यातून हजारो मजूर त्यांच्या गावी दाखल झाले. त्यानंतर आता राज्यातील अनेक ठिकाणी परप्रांतीय मजुरांची संबंधित यंत्रणेकडे परवानगीसाठी गर्दी होताना दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत देखील रविवारी मजुरांनी परवानगीसाठी गर्दी केली होती. उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे शेकडो मजूर आरोग्य तपासणी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत होते. उन्हातान्हाची पर्वा न करता हे मजूर सोशल डिस्टन्स पाळून रांगेत उभे होते. यावेळी आम्हाला गावी जाण्यास परवानगी केव्हा मिळणार? आमची गावी जाण्याची व्यवस्था कशी केली जाणार आहे? असे प्रश्न हे मजूर विचारत होते. एकंदरीत सध्या सारी परिस्थिती पाहता या मजुरांना आपल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे.