रत्नागिरी : काल घरोघरी गौराईचं आगमन झालं आणि आज सर्वत्र गौरीचं पूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आलं. भाद्रपद शुद्ध पक्षात, जेष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीपूजन करतात. आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी घरी आणायच्या, दुसऱ्या दिवशी पूजा करायची व तिसऱ्या दिवशी गणपती विसर्जनासोबत त्यांचं विसर्जन करायचं अशी पद्धत आहे. कोकणात मुखवटय़ांच्या रूपात, उभ्या पाटावर ठेवून, फोटोच्या रूपात, तेरडय़ाच्या फुलासहित रोपाच्या रूपांत तर काही ठिकाणी खडय़ांच्या रूपात गौरी पूजल्या जातात. कोकणात बहुतांश ठिकाणी एकच गौराई आणली जाते, मात्र चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील गिरीश गुरप यांच्या घरी 2 गौरींची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. यावर्षीचं त्यांच्या गौरी पूजनाचं 84 वं वर्ष आहे.
दरम्यान गौरी पूजनाच्या दिवशी ‘गौरी ओवसा’ करण्याची पद्धत कोकणात आहे. त्यामुळे या सणाला माहेरवाशिणी माहेरी येत असतात.
कोकणातल्या गणेशोत्सवात गौरी पूजनाचा दिवस महत्वाचा असतो. कारण गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा किंवा गोड नैवेद्य दाखवला जातो. पण गौरी पूजनाच्या दिवशी कोकणातील मांसाहार करणाऱ्या घरात आज तिखटा सण साजरा होतो. गणेशउत्सवापूर्वी श्रावण महिन्यापासूनच अनेकजण मांसाहार सोडतात. मग हा मांसाहाराचक उपवास गणेशोत्सवापर्यंत कायम राहतो… घराघरात गौरीचं आगमन झालं की पूजनाच्या दिवशी या माहेरवाशिणीला काही घरांमध्ये तिखट मांसाहाराचा नेवैद्य दाखवला जातो.
माहेरवाशीण असलेल्या गौरीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्या नंतर गणेशोत्सवासाठी गावात दाखल झालेले चाकरमानी आणि सारेच हा “तिखटा” सण जोरात साजरा करतात… आज रात्री गौरी समोर झिम्मा फुगडी सारखे महिलांचे खेळ रंगतील… कोकणातील गावागावातील घरात अगदी पहाटेपर्यंत गौरी समोर हा जागर सुरु राहतो.