मुंबई : घरगुती गॅस वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना लागलेल्या आगीत सात कामगार होरपळल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजता घडली. कांजूरमार्गमधील गांधी नगर जवळ हा प्रकार घटला. जेसीबी मशीनच्या सहाय्याने काम सुरू होते. याचवेळी मशीनचा फटका वाहिनीला बसून ती फूटली आणि त्यातून बाहेर पडलेल्या वायूने क्षणार्धात पेट घेतला. उंचच उंच आगीच्या ज्वाळा येथे पसरल्या होत्या. या घटनेमुळे कामगार सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
भाजलेल्या कामगारांना राजावाडी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तीन जणांना उपचार करून घरी पाठविण्यात आले. चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रामसिंग राठोड (३१), गजानन जाधव (३२), गजानन पवार (३५), मानस मेहनती (२९), धर्मेंद्र राय (२५), संदीप गौतम (२३), इंजिनियर अली (३०) अशी जखमींची नावे आहेत.
अग्निशमन दलाचे बारा बंब घटनास्थळी पोहचल्या. वाहिनीतून ज्वलनशील वायूचा प्रवाह होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते. अखेर महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्य प्रवाह बंद केला आणि ही आग विझली.
अग्निशमन दलाकडून घटनेचा अहवाल आल्यावर संबंधीत अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितले.