रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील वाटद कोंडवाडी येथे होऊ घातलेल्या हिरानंदानी कंपनीच्या गॅस पाईपलाईन संदर्भात ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. वाटद आदी परिसरातील ग्रामस्थांच्या वस्तीतून ही गॅस पाईपलाईन नेण्यात येणार असल्याने येथील ग्रामस्थांवर होणाऱ्या अन्यायाला बहुजन विकास आघाडी व स्वाभिमान संघटनांनी खंबीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या येथील भूसंपादनाच्या कार्यवाहीला या दोन्ही संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत कार्यवाही थांबवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
वाटद येथील पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या ग्रामस्थांची घरे , शेती उध्वस्त होत आहेत. हिरानंदानीच्या हट्टापायी शासन व प्रशासन ग्रामस्थांप्रती हिटलरप्रमाणे वागत आहे. ही चीड आणणारी बाब आहे. याचा उद्रेक पंचक्रोशीमध्ये होत आहे. याबाबत बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी होत असलेल्या अन्यायाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. बहुजन विकास आघाडीने कुणबी बहुजन कष्टकरी वर्गासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी पुर्ण ताकदीने उभे राहण्याचे वचन ग्रामस्थांना दिले आहे. कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील, बहुजन विकास आघाडीचे सुरेश भायजे लवकरच बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. यामध्ये कोंडवाडीवर ग्रामस्थांवर होणाऱ्या अन्यायाबाबत व प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत कायदेशीर बाबी तपासून आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. दरम्यान, नुकतीच बहुजन विकास आघाडीचे जिल्हाप्रमुख तानाजी कुळ्ये, तालुकाध्यक्ष टी. एस. दुडये, उपतालुकाप्रमुख संजय शीतप, यांनी ग्रामस्थांची भेट घेवून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
स्वाभिमानचीही ग्रामस्थांना साथ
ज्वालाग्राही पाईपलाईन वाडीतून नेण्यात येत असल्याने दडपशाहीचे धोरण राबवले जात आहे. या प्रकल्पामुळे शेतजमिनी तर उध्वस्त होणार आहेत. मात्र ग्रामस्थांच्या घरादारांना धोका निर्माण झालेला आहे. पाईपलाईनचा जो पहिला सर्वे झाला होता तो वाडीच्या बाहेरून करण्यात आला होता. पण शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ही गॅस पाईपलाईन वाडीच्या मध्यातून टाकण्याचा कुटील डाव खेळला जात असल्याचे स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष नागरेकर, तालुकाध्यक्ष सचिन आचरेकर यांचे म्हणणे आहे. ही पाईपलाईन वाडीबाहेरून मोकळ्या जागेतून नेण्यात यावी अशी मागणी आहे. मात्र ही पाईपलाईन लादल्यास स्वाभिमानच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवासी जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांना निवेदन देते वेळी देण्यात आला आहे.