रत्नागिरी, (आरकेजी) : सिलिंडर मधून ज्वलनशील वायूची गळती होऊन झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाल्याची घटना चिपळूण शहरात आज घडली. वडनाका परिसरात सकाळी अकराच्या सुमारास दुर्घटना घडली. स्फोटात खोलीच्या भितींचे मोठे नुकसान झाले आहे.
वडनाका परिसरातील शिवपार्वती अपार्टमेंटमध्ये खेडेकर कुटुंब रहाते. त्यांच्या घरी कोणी नसताना सिलिंडरमधून वायूची गळती होऊन वास येऊ लागला. शेजार्यांनी त्यांना दूरध्वनी करून माहिती दिली. खेडेकर घरी आले तेव्हा संपूर्ण घरात वायू पसरला होता. वायू बाहेर जावा यासाठी त्यांनी तातडीने खिडक्या उघडल्या. आतील बेडरूममध्ये ते आले असता त्यांनी पंखा सुरू केला. आतील खोलीत कोंडून राहिलेला वायू विजेच्या संपर्कात आल्याने खोलीत स्फोट झाला. यात एका मुलासह दोनजण जखमी झाले. जखमींवर चिपळूणातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.