मुंबई : गरवारे-वॉल रोप्स लि. (जीडब्लूआरएल) या भारतातील आघाडीच्या टेक्निकल टेक्स्टाइल्स कंपनीने कॉर्पोरेट ब्रँड व ओळख बदलून, गरवारे टेक्निकल फायबर्स लि. (जीटीएफएल) असे नामकरण केल्याचे जाहीर केले आहे. ब्रँडिंगमध्ये करण्यात आलेला बदल, येत्या 5 ते 7 वर्षांत नफा दुप्पट करणे व कंपनी कार्यरत असलेल्या सर्व प्रमुख क्षेत्रांच्या बाबतीत जगातील आघाडीच्या 2 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणे, या कंपनीच्या उद्दिष्टाचा एक भाग आहे.
“गेल्या चार दशकांमध्ये, आम्ही गुणवत्ता, मूल्य, नावीन्य या बाबतीत प्रतिष्ठेचे स्थान निर्माण केले आहे आणि तेच आमच्या नावामध्ये व ब्रँडमध्येही दिसून येणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटते,” असे गरवारे टेक्निकल फायबर्स लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वायू गरवारे यांनी सांगितले. “आम्ही ज्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहोत, ती क्षेत्रे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी आहेत. उदाहरणार्थ, आमची उत्पादने शेती व फिशरीजची प्रगती व उत्पादकता यावर भर देणारी आहेत आणि त्यांचे भारताच्या जीडीपीतील योगदान जवळजवळ 14 ते 15% आहे. आम्ही नफा दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याने पुढील पाच ते सात वर्षे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहेत आणि आमच्या सर्व प्रमुख क्षेत्रांच्या बाबतीत जगातील आघाडीच्या 2 क्रमांकांमध्ये स्थान मिळवून ते साध्य केले जाणार आहे.”
“आमचे नवे नाव व ओळख म्हणजे मूल्य निर्माण करण्याप्रती आमच्या बांधिलकीचे प्रतिक आहे. आमच्या नावाने अंदाजे 2o पेटंट असून, आमची कंपनी बदल, नावीन्याला महत्त्व देणारी आहे आणि ती व्यवसायांवर लक्षणीय परिणाम करेल व ग्राहकांना उत्तम मूल्य देईल, अशा पर्यायांचा अवलंब करते”, असे त्यांनी नमूद केले.
“आमच्यासाठी हे परिवर्तन अतिशय महत्त्वाचे आहे आणि टेक्निकल टेक्स्टाइल व्यवसायातील आमच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने मूलभूत आहे,” असे गरवारे टेक्निकल फायबर्स लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुजौल रेहमान यांनी सांगितले. “75 हून अधिक देशांत आमच्या मूल्यवर्धित सेवांमध्ये वाढ करणार आहोत आणि आमच्या संबंधित घटकांना सेवा देण्यासाठी भारतात व जगात अशा दोन्ही ठिकाणी आमचा व्यवसाय वाढवणार आहोत”, असेही ते म्हणाले. कंपनीचे नाव व ओळख बदलल्यानंतर, कंपनी आता ‘गरवारे टेक्निकल फायबर्स लि.’ या नावाने ओळखली जाणार आहे.