रत्नागिरी : सन २०१७ मधील पहिल्याच अंगारक चतुर्थीनिमित्त कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी लाखो भाविक पहाटेपासूनच दाखल झाले आहेत.
अंगारक चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक गणपतीपुळ्यात दाखल होत असतात. मागील वर्षी सन २०१६ मध्ये अंगारक चतुर्थीचा योग नव्हता. यावर्षी तर तब्बल तीन वेळा अंगारक चतुर्थी आली आहे. या पुढील चतुर्थी जून आणि नोव्हेंबरमध्ये असणार आहे. मागील वर्षी अंगारकी चतुर्थी नसल्याने या वर्षीच्या पहिल्याच अंगारक चतुर्थीला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, गोवा, कर्नाटक आदी विविध भागातून भाविक गणपतीपुळ्यात दाखल झाले आहेत.