रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)-रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. शिवकुमार सीताराम बाडगडि (२० वर्षे) आणि सचिन चन्नप्पा कोष्टी (२१ वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही कर्नाटकमधील विजापूरचे रहिवासी आहेत.
गणपतीपुळे इथे फिरण्यास आलेल्या शिवकुमार आणि सचिन यांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरला नाही. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हे दोघेही समुद्रात पोहण्यास उतरले. त्यावेळी नेमकी ओहटी होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. हे दोघेही बुडू लागल्याचे जीवरक्षक राज देवरूखकार यांना समजताच त्यांनी समुद्रात धाव घेतली. बुडणाऱ्या या दोघांनाही डोर्लेकर बंधू यांच्या जेट्स किच्या साहाय्याने जीवरक्षक राज देवरूखकर यांनी सुखरुप बाहेर काढले.
हे दोघेही पर्यटक ज्या ठिकाणी पोहण्यास उतरले होते. त्या चाळेच्या ठिकाणी पोहण्यास प्रतिबंधक क्षेत्र असे फलक लावलेले आहेत. या दोघानाही जीवरक्षकानी या ठिकाणी पोहण्यास जाऊ नका अशा सूचना दिल्या होत्या. मात्र तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष करून हे दोघेही या ठिकाणी पोहण्यास गेले.