
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. जवळपास 187 फेऱ्या ट्रेनच्या सोडण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरीसाठी सुटलेली पहिली गणपती स्पेशल ट्रेन आज (रविवार) पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली, वेळेआधीच जवळपास अर्धा ते पाऊण तास अगोदर ही ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली, मात्र अवघे 11 चाकरमानी या ट्रेनने रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले. त्यामुळे अतिशय अल्प प्रतिसाद या ट्रेनला मिळाल्याचं पहायला मिळालं.

पण 2 दिवसांपूर्वी गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा झाली, आणि कालपासून (शनिवार) या ट्रेन मुंबईतून सुटण्यास सुरुवात झाली आहे. मात्र दरवर्षी ट्रेनने हजारोंच्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या यावर्षी मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती. रत्नागिरीत दाखल झालेल्या या पहिल्या गणपती स्पेशल ट्रेनने अवघे 11 चाकरमानी रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाले. तर दुसऱ्या ट्रेननेही अवघे 16 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले.. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आलेली दुसरी ट्रेन म्हणजेच सीएसएमटी- सावंतवाडी ही ट्रेन सावंतवाडीकडे रवाना झाली. मात्र सावंतवाडीकडे रवाना होताना सुद्दा रेल्वेचे अनेक डब्बे रिकामे पहायला मिळाले. पण याच ट्रेन काही दिवस अगोदर सुरू झाल्या असत्या तर मात्र परिस्थिती वेगळी दिसती, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गणपती स्पेशल ट्रेनचं नियोजन अगोदर झालं असतं, तर फार चांगलं असतं अशा प्रतिक्रिया आलेले चाकरमानी व्यक्त करत आहेत.एकूणच गणपती स्पेशल ट्रेनला थंडा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे..
दरम्यान ट्रेनने आलेल्या चाकरमान्यांची रेल्वे स्थानकात आरोग्य तपासणीही केली जात असून येणाऱ्या प्रवाशाची पूर्ण माहिती आरोग्य यंत्रणेकडून घेतली जात आहे,तसेच 55 वर्षांवरील प्रवाशांची अँटीजेन टेस्टही केली जात आहे.