रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री देव गणपतीपुळे देवस्थानला आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हा प्रमाणपत्र प्रदान सोहळा नुकताच गणपतीपुळे येथे पार पडला.
राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळे इथं येत असतात. दरवर्षी चाळीस लाखाहून अधिक भाविक गणपतीपुळ्यात दर्शनासाठी हजेरी लावतात. त्यातच गणपतीपुळे देवस्थानने गेल्या काही वर्षांत नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत.सुसज्ज असा भक्तनिवास, आधुनिक युगात भाविकांसाठी गणपतीपुळे देवस्थानचा मोबाईल अँप सुरू केले आहे. देवस्थानच्या या सर्व कामांची दखल घेऊन त्याना आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते श्री देव गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर,शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत,नगराध्यक्ष राहूल पंडित, ऍड बाबा परुळेकर,महेश मालपाठक,जि.प.सदस्या साधना साळवी व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान गणपतीपुळे मंदिरात दुपारी बारा वाजता होणारी आरती आता देवस्थानच्या अँपवर भाविकांना पाहता येणार आहे.तसेच कोंकणातील विविध पर्यटन स्थळांची माहिती सांगणारी कोंकण दर्शन ही सीडी देवस्थानने तयार केली आहे.या दोन्ही उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.