रत्नागिरी (आरकेजी): गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकाचा समुद्रकिनारी फीट येउन मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3 च्या सुमारास घडली. प्रदीप देविदास वाघाडे (२८, रा. बोरी महाल ता. कळंब जि. यवतमाळ) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.
याबाबत रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात मोहन तानबाजी झोडे (४३, रा. ता. कळंब जि. यवतमाळ ) यांनी खबर दिली आहे. त्यानुसार, मोहन झोडे हे यवतमाळ येथे कपडा व्यापारी आहेत. सुट्टीनिमित्त ते आपल्या कुटुंबियासोबत झायलो कार (एमएच-२९-एडी-५६४०) घेऊन गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. त्यांच्या कारवर प्रदीप वाघाडे हा चालक म्हणून कामाला होता. काही दिवसांपूर्वी ते मिरज, पंढरपूर, कोल्हापूर या ठिकाणी फिरुन बुधवारी गणपतीपुळे येथे आले होते. दुपारी ते आपल्या कुटूंबियांसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरत व फोटो काढत होते. तेव्हा प्रदीपला उलट्या होऊ लागल्या व फीट येऊ लागली. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने मोहन झाडे यांनी आणि आजूबाजूच्या पर्यटकांनी मिळून त्याला रुग्णवाहिकेने प्रथम मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. तेथून अधिक उपचारांसाठी प्रदीपला रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.