रत्नागिरी (आरकेजी): गणेशोत्सव, दहीकाला, नवरात्रौ व इतर सण निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे. उत्सव काळात सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय राखून अपघातविरहित वाहतुकीबरोबरच गणेशभक्तांना आवश्यक सोई- सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, मुंबई- गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीसांनी जागरूक रहावे. तसेच गणेशभक्तांचा ओघ सुरू होण्यापूर्वी महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम संबधित विभागांनी पूर्ण करावे. जिल्हयात गणेशउत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांच्या मदतीसाठी महामार्गावर मदतकेंद्र उभारण्यात यावेत. या मदत केंद्राच्या माध्यमातून वाहनधारकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात याव्यात आणि आवश्यक मदतदेखील उपलब्ध करुन द्यावी. मदत केंद्राच्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णवाहिकेत औषधे आणि डॉक्टर्सची उपलब्धता ठेवावीत. या काळात गावपातळीवर साथीचे आजार उद्धवू नयेत याकरिता आरोग्य विभागाने जिल्हयातील सर्व स्टेशन व बस स्थानकाच्या ठिकाणी आरोग्य पथक ठेवावीत. तसेच नगरपालिकांनी सुद्ध त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वच्छतेची काळजी घेऊन रोगराई टाळावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले विसर्जन काळात होणारे अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलकाद्वारे जनजागृती करावी. धोकादायक विसर्जनस्थळांवर जीवरक्षक उपलब्ध करुन देण्यात यावा. जीवरक्षकांना आवश्यक साहित्य प्रशासनाकडून देण्यात यावे. जिल्हाभरातील विसर्जनस्थळी स्थानिक यंत्रणांमार्फत निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. महावितरणला उत्सव काळात लोडशेडींग करु नये अशी सूचना देतांनाच विसर्जनांच्या दिवशी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अतिरीक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे, असे ही ते म्हणाले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवास प्रशासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत असून प्लास्टीक, थर्माकॉल यारख्या पर्यावरणाची हानी करणाऱ्या घटकांचा वापर टाळण्यासाठी जनजागृत्ती करण्यात यावी. जिल्हाभरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उत्सावाशी संबधित सर्व यंत्रणेने सतर्क रहावेत अशा सूचना दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपप्रादेशिक परिवहण अधिकारी विनोद चव्हाण, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग बनगोसावी, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेठकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क संध्याराणी देशमुख, रत्नागिरीचे तहसिलदार मश्चिंद्र सुकटे, प्रदुषण निंयत्रण अधिकारी संदीप सोनावणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मोरे, विभागीय वाहतूक अधिकारी एस.जी. बोगट, रत्नागिरी शहर व्यापारी संघाचे उदय पेठे आदि विभागाचे अधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.















