रत्नागिरी : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच पुणे येथून चाकरमानी येत असतात त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी महामार्गावरील तसेच अंतर्गत रस्तांची दुरुस्ती करा, रस्त्यांवरील खड्डे बुजवा अशा सूचना राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रविंद्र वायकर संबधिताना दिल्या.
जिल्हाधिकारी सभागृह येथे आयोजित गणेशोत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सां.बा. विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांतधिकारी अमित शेडगे, महावितराचे अधीक्षक अभियंता पी.जी. पेठकर आदि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी यावेळी प्रत्येक विभागनिहाय आढावा घेतला व गणेशोत्सव सणाच्या दृष्टीने प्रत्येक विभागाकडून करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली. पालकमंत्री म्हणाले मुंबई-गोवा रस्त्यावरील खेड जगबुडी नदीवरील पूलचे काम तत्काळ करुन तो वाहतूकीसाठी सुरु करा, चिपळूण वाशिष्ठ नदीवरील पूलाच्या पर्यायी मार्ग गुहागर बायपासचा वापर होणार असल्याने तो व्यवस्थित करुन घ्या, महामार्गावरील धोकादायक किंवा वळणावर दिशादर्शक फलक लावा, जिल्हापरिषद रस्त्यावरील वाढलेली गवत (झुडूपे) छाटणी करा अशा सूचना त्यांनी संबधिताना दिल्या.
ते म्हणाले रेल्वेला जोडणारी एसटी वाहतूक चालू करा, रेल्वे स्थानकांची, टॉयलेट्स व इतर स्वच्छता जंतुनाशके पावडर वगैरे वापरुन करा, रेल्वेस्थानक व मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते, रस्त्यांची डागडुजी, खड्डे भरणे इत्यादी कामे करा, 108 ॲम्बुलन्सची व्यवस्था, ठिकठिकणी आरोग्याच्या दृष्टिने चौक्या, पाणी व्यवस्था गणेश विसर्जनाच्या वेळी विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अशी चोक व्यवस्था ठेवा, गणेशोत्सवाच्या काळात वीज खंडीत होणार नाही याची दक्षता घ्या आणि खंडीत झाली तर ती तात्काळ पुर्ववत करण्यासाठी व्यवस्था ठेवावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा दक्षता समिती बैठक
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत गोदाम दुरुस्ती, धान्य वाटप, इंटरनेट सेवा आदि विषयांवर चर्चा झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांतधिकारी अमित शेडगे आदि मान्यवर उपस्थित होते.