मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बध लागू नसतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातील निवेदन विधानसभेत पटलावर ठेवल्यानंतर दिली.
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्यादा बसेस सोडण्यात येतात. मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. गणेशोत्सवाच्या काळात ही वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी १६ टनापेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना या महामार्गावर पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) दरम्यान २३ ऑगस्टपासून मर्यादित कालावधीसाठी बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठाणे,कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमरेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या मार्गांवर अवजड वाहनांना बंदी असेल.
23 ऑगस्ट रोजी 00.01 वाजेपासून 25 ऑगस्ट रोजी 20.00 वाजेपर्यंत, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपासून 1 सप्टेंबर रोजी 20.00 वाजेपर्यंत, 5 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून 6 सप्टेंबर रोजी 20.00 वाजेपर्यंत याकालावधीत ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी अवजड वाहनांना ज्यांची क्षमता 16 टनापेक्षा अधिक आहे, त्यांना वाहतुकीस पूर्णत: बंदी करण्यात आली आहे.
26 ते 30 ऑगस्ट व 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 20.00 वाजेपर्यंत या कालावधीत अवजड वाहनांना या मार्गावर वाहतुकीस बंदी असेल. 26 ते 30 ऑगस्ट व 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत नमूद वाहनांना रात्री 20.00 ते सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी राहील.
गौण खनिजाच्या वाहतुकीस बंदी
मात्र, 23 ऑगस्ट रोजी 00.01 वाजेपासून 6 सप्टेंबर रोजी 20.00 वाजेपर्यंत या कालावधीत या महामार्गावर वाळू, रेती व तत्सम गौणखनीजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहील.
जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीस निर्बंध नाही
दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हे निर्बंध लागू नसतील, असे मंत्री रावते यांनी सांगितले.