मुंबई : मुंबईतील फुटपाथवर मूर्तीकलेशी संबंध नसलेली मंडळी मंडप परवानगी घेऊन दुकाने थाटत आहे. या तोतया लोकांना रोखण्यासाठी गणेश मूर्तिकारांची परीक्षा घेऊन मंडप परवानगी द्या, अशी मागणी श्री गणेश मूर्तिकला समितीने मुंबई महापालिकेकडे मागणी केली आहे.
मुंबई शहर व उपनगरात गणेशोत्सवाच्या पूर्व काळात फुटपाथवर व खाजगी जागांवर मुंबई महापालिकेकडून गणेश मूर्ती विक्री करिता मंडपे उभी करण्याची परवानगी दिली जाते. ही चांगली बाब असली तरी त्याचा गैरफायदा तोतया स्वयंघोषित मूर्तिकारांनी घेतला आहे. या घुसखोरांमुळे सार्वजनिक पदपथे अडविली जात असून खऱ्या जातिवंत मूर्तिकारांना मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे, श्री गणेश मूर्ती कलेची वर्षानुवर्षे जोपासना करणाऱ्या हाडाच्या मूर्तिकलाकारांनाच व्यवसाय करण्याकरिता प्राधान्य मिळावे, यासाठी मूर्तिकार समितीचा आग्रह आहे.
गणेश मूर्तीचे बाजारीकरण करणारे व्यावसायिक व तोतया गणेश मूर्तिकार यांचा पायबंद व्हावा यासाठी महापालिकेने परवानगी देण्यापूर्वी गणेश मूर्तिकलेची चाचणी परीक्षा घ्यावी . जेणेकरून खरे मूर्तिकार कोण ? हे आपोआपच समोर येईल.
मुंबई महापालिकेने याआधी श्री गणेश मूर्तिकारांबाबत धोरणात्मक निर्णय घेतला होता त्यानूसार मुर्तीकारांना गणेश मूर्ती घडविण्यासाठी मोकळे भूखंड, मोकळे मैदान , खेळाची मैदाने अशा सोयीच्या जागी तात्पुरते मंडप उभारण्याकरिता सशुल्क आकारून परवानगी द्यावी, असा निर्णय घेतला होता . त्याची अंमलबजावणी झाली असती तर फुटपाथवर विक्रीसाठी मंडप परवानगी मागणाऱ्या तोतया मुर्तीकारावर निर्बध येतील, याकडे मूर्तिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंत राजे यांनी लक्ष वेधले आहे.