रत्नागिरी : जगातील 157 देशांमध्ये महात्मा गांधीजींचे पुतळे उभारले जातात. जागतीक दर्जाच्या विद्यापीठात गांधी विचारावर संशोधन केले जाते. बराक ओबामा, मार्टिन ल्युथर किंग ज्यनियर या सारख्या नेत्यानी गांधीजींची विचारसरणी अंगिकारली. मात्र आपल्याच देशात त्यांच्यावर गलिच्छ आरोप करुन बदनाम केले जाते. गांधीजींचे विकृतिकरण आपल्या देशात फार झाले आहे. हा आपला करंटेपणा आहे. देशातील लोकशाही टिकवायची असेल तर गांधी विचाराशिवाय पर्याय नाही. असे मत युवक बिरादरी संस्थेचे महासंचालक, युवा मार्गदर्शक, ज्येष्ठ अभ्यासक आशुतोष शिर्के यानी व्यक्त केले.
महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती वर्षशताब्दी निमित्त नवनिर्माण शिक्षण संस्था व नगरवाचनालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात गांधी समजून घेताना’ या विषयांवरील व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आशुतोष शिर्के पुढे म्हणले की, विचारांचा लढा ज्यावेळी विचराने करता येत नाही. त्यावेळी त्यांना वेगळ्या मार्गाने बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जाते. महात्मा गांधीजी बाबत वॉटस्अपवरती गलिच्छ विचार पेरले जातात. असे लोक सतत गांधी विचारांचा खून करतात. कांही व्यक्तिकडून नथुराम गोडसेचे उदात्तिकरण केले जाते. महात्मा ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे शिक्षित तरुणांनी खरा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.
गांधी-नेहरूंचे विचार संपवावे असे का वाटतात ? असा सवाल करुन गांधीजींचे विचार आज झाडू आणि चष्मात बंदिस्त केले जात आहेत. अहिंसेच्या मार्गातून गांधीजींनी निर्भयतेचे बीज पेरले. स्वराज्याऐवजी स्वातंत्र्य या शब्दाला अधिक महत्व दिले. त्यातूनच इग्रंजांविरुध्द लढा दिला व चलेजाव असे ठणकावून सांगितले, असे आशुतोष शिर्के म्हणाले. याप्रसंगी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यानी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला नजरवाचनालयाचे अध्यक्ष दिपक पटवर्धन व रत्नागिरी मधील प्रतिष्ठित व्यक्ति उपस्थित राहीले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सचिन टेकाळे यानी केले.