कथांच्या प्रकारात गुढ-रहस्यमय हा कथाप्रकार खूपच लोकप्रिय आहे. गुढ आणि रहस्यमय गोष्टींकडे नेहमीच माणूस आकर्षीला जातो. म्हणूनच एक वेगळे जग, वेगळी माणसे, एखाद्या किल्ल्यातील गुढ, भावभावना, गुंतागुंत अशा परिपूर्ण बाबींचा समावेश एखादा कादंबरीत असेल तर ती नेहमीच वेगळी ठरते. अशा कथा लिहिताना लेखकाचा कस लागतो. अशा प्रकारची कादंबरी वाचताना पानाच्या वळणावळणावर बदलत जाणारी कथा, येणार्या पात्रांचा यशस्वी वापर, सोबतीला भीती, आभास उभे करणे आणि वाचकाला त्यात खिळवून ठेवणे हा गुढ कथेतील नियम जो वापरतो, तो अशा प्रकारच्या कथा वाचकांसमोर ठेवण्यास यशस्वी ठरतो. रत्नाकर मतकरी यांची ’गहिरे पाणी’ ही कादंबरी म्हणूनच सर्वश्रेष्ठ ठरते. सन २००१ पासून ते २०१६ पर्यंत या कादंबरीची सातवी आवृत्ती प्रकाशीत झाली आहे आणि आजही वाचकांच्या पसंतीस उतरली आहे.
सत्य आणि आभासाची बेमालूपणे मिसळणं यात केली गेली आहे. एक नवीन आंणि माणसाच्या आकलनापलीकडचे अद्भभूत असे आभासी जग या कादंबरीत मतकरींनी यात ज्या पद्धतीने उभे केले आहे, त्याला तोड नाही.
एकूण १६ कथा ’गहिरे पाणी’त आहेत. मृत्यूची तारीख सांगणारा चमकत्या डोळ्यांचा मुलगा, वाड्याचा वारस ठरवताना वारसदाराला द्यावा लागणार विचित्र पुरावा, साधे वाटणारे खुनी हातमोजे, हॉस्टेल-मधल्या मित्रांचा ड्रॅक्युला सिनेमा बघणं आणि त्यातून निर्माण होणार एक वेगळंच नाट्य, श्रीमंत असलेल्या कुटुंबातील पिरोजाबाई यांना ऐकू येणारे व मृत्यूची सूचना देणारे घड्याळाचे टोले आणि अशा १६ कथांमधून वाचकांच्या मनावर पुस्तक वाचताना भीतीची लहर उमटते.
आज आपण विज्ञानवादी जगात राहत आहोत. तंत्रज्ञानाने मानवी आयुष्य व्यापून टाकला आहे. तेव्हा विज्ञानाने ज्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित ठेवली आहेत, ती येणाऱ्या काळात मिळतील तेव्हा मिळतील. आज तरी ही उत्तरे आणि हे प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांना या जगापेक्षा वेगळ्या जगाकडे आकर्षित करतात. यातूनच गूढकथांचं जग डोकावत आणि रत्नाकर मतकरींच्या लेखणीतून वाचक या विलक्षण-अकल्पनीय जगात प्रवेश करतात आणि कादंबरीतील कथांमधलं गूढ वातावरण वाचकाच्या मनात दीर्घ काळ घर करतं राहते.
कादंबरीच्या नावाप्रमाणे यातील प्रत्येक कथात मतकरींनी गहिरे रंग भरले आहेत.त्यामुळेच गुढतेच्या कसोटीवर ही कादंबरी उत्कृष्टरित्या उतरली आहे.
पुस्तकाचे नाव : गहिरे पाणी
लेखक : मतकरी रत्नाकर
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : २०६
किंमत : २०० रुपये