संजय भालेरावांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे घाटकोपर मध्ये
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – येत्या २० नोव्हेंबरला होणारी निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची असून आपले राज्य महाराष्ट्र राहणार की अदानी राष्ट्र होणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्या रक्षणाची निशाणी मशाल असून घाटकोपर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे संजय भालेराव यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घाटकोपर येथे केले. यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे शिवसेनेचे घाटकोपर येथील उमेदवार संजय भालेराव यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे काल रात्री घाटकोपर या ठिकाणी आले होते. यावेळी त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. गद्दारी करुन सत्तेत आलेल्या खोके सरकारला आता घालवण्याची वेळ आली आहे. या निवडणूकीत गद्दारांना सोडणार नाही. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत माहिमकरांवर बंदूक रोखणा-या व पोलीस ठाण्यात गोळीबार करणा-याला आपण सोडणार नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. २३ नोव्हेंबरला आपले सरकार आल्यावर २४ तारखेला यूएपीए अतिरेकी कायद्याखाली अटक करुन यांना आत टाकणार, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.