नवी दिल्ली : विदर्भाचे खजुराहो अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिध्द मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोध्दाराचे कार्य भारतीय पुरातत्व विभागाकडून गतीने सुरु आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधीन असणा-या भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने मार्कंडेश्वर मंदिराच्या सुरु असलेल्या जीर्णोध्दाराच्या कार्याबाबत मंत्रालयाने माहिती दिली आली आहे. गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदी तिरावर स्थित भगवान शिवाचे पुरातन मार्कंडेश्वर मंदिर हे उत्तर भारतातील प्रसिध्द ‘नागरा’ शैलीतील मंदिर असून मंदिर जीर्णोध्दाराच्या कामाला नोव्हेंबर 2017 मध्ये सुरुवात करण्यात आली.
मार्कंडेश्वर मंदिराचे निर्माण इ.स. च्या 9 ते 12 व्या शतकात झाले आहे. शिव ,वैष्णव आणि शाक्त भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या या पुरातन मंदिराचे गर्भगृह आणि शिखर उन्मळून पडले आहे. 120 वर्षांपूर्वी स्थानिक गोंड राजाने या मंदिराचा जीर्णोध्दार केला होता. मात्र, हे जीर्णोध्दाराचे काम शास्त्रीय व तांत्रिकदृष्टया योग्य नसल्याने मंदिराचा काही भाग उन्मळून पडला होता. या पार्श्वभूमीवर, भारतीय पुरातत्व विभागाने मंदिराच्या जीर्णोध्दाराचे कार्य हाती घेतले. यानुसार, मंदिराच्या दोन्ही बाजुंच्या तुलनेत जास्त नुकसान झालेल्या उत्तरेकडील बाजुच्या दुरुस्तीचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले.
मंदिराच्या नुकसानग्रस्त दोन भिंती दरम्यानच्या जागेची दगड, विट आणि चुना यांचा उपयोग करून दुरुस्ती करण्यात आली आहे. मंदिरातील जवळपास 1500 नुकसानग्रस्त दगड काढून टाकण्यात आले असून तेथे भराव घालण्याचे काम सुरु आहे. गर्भगृहातील दगडांना क्रमवारी देण्यात आली तसेच मूळ दगड व साहित्याची जोपासना होण्याच्या दृष्टीने शास्त्रोक्तरित्या त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. आतापर्यंत मंदिराच्या भिंती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून कळसाच्या दुरुस्तीचे कार्य हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.