महाड : रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडवर सुरु असलेली कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये रायगडचे बदललेले रुप पहायला मिळेल असा विश्वास रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
रायगड विकास प्रधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 3 नोव्हेंबरला पत्रकारांसमवेत किल्ले रायगडचा दौरा केला आणि झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांची माहिती पत्रकारांना दिली.
किल्ले रायगड आणि परिसरातील २१ गावांतील विकास कामांसाठी सहाशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्यापैकी केवळ १२० कोटी रूपये प्रत्यक्षात रायगड किल्ला संवर्धनाच्या कामावर खर्च करण्यात येणार आहेत. उर्वरित निधी हा या प्रधिकरणात समाविष्ट करण्यात आलेल्या २१ गावांमध्ये विविध प्रकारची विकास कामे आणि सुविधा उपलब्ध करून देण्यावर खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्खनन आणि ऐतिहासिक वास्तुंच्या संवर्धन कामासाठी अकरा कोटी रूपयांचा निधी पुरातत्व विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहितीहि त्यांनी दिली. यातून उत्खनन,गडावरील कोअर एरिया, तटबंधी आणि मनोर्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. शिर्काई मंदिर, वाडेश्वर मंदिर, जगदिश्वर मंदिर या परिसरातील संवर्धनाची कामे पूर्ण झाली असून ती यावेळेस पत्रकारांना दाखविण्यात आली. संवर्धनासाठी ६०० कोटी मंजूर झाले असून त्यापैकी १२० कोटी रुपये रायगडवर तर उर्वरित रक्कम प्राधिकरणातील २१ गावांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर खर्च करण्यात येणार आहे.
गडावरील ८४ पाण्यांच्या टाक्यांपैकी २१ टाक्यांतील, त्याचप्रमाणे कुशावर्त तलाव आणि हत्ती तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ज्या टाक्यांमधील गाळ साफ करण्यात आला आहे, त्या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य झाले आहे. गाळ काढण्यात आल्याने या सर्व ठिकाणांवरील पाणी साठवण क्षमता देखील वाढली आहे.
चित्तदरवाजा, कुशावर्त तलाव परिसर, हत्ती तलाव, शिवकालीन नालेव्यवस्था, शिर्काई मंदिर, नाना दरवाजा या भागात पूर्ण झालेली आणि सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी जाऊन खा. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांना या कामांची प्रत्यक्ष माहिती यावेळेस दिली.
पाचाड परिसरात ८८ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी शिवसृष्टी, युध्द संग्रहालय, शिवकालीन वस्तुंचे संग्रहालय उभे करण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
किल्ले रायगड परिसरातील जी २१ गावे रायगड प्रधिकरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्या गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रितनिधी यांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येणार असल्याचे खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यामध्ये कार्यकारी अभियंता विश्वनाथ सातपुते, प्रधिकरणाचे काँन्झर्वेशन इंजिनिअर वरूण भामरे, त्याचप्रमाणे अन्य शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
हा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर पाचाड येथील देशमुख हॉटेलमध्ये खा. संभाजीराजे छत्रपती यांनी महाडचे प्रंताधिकारी श्री. विठ्ठल इनामदार आणि महावितरणच्या अधिकार्यसांबरोबर चर्चा केली.