तरुणाईसाठी ‘गच्ची’ म्हणजे त्यांच्या बालपणीची आठवणी जपणारी जागा. आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हवा असलेला निवांतपणा ही ‘गच्ची’ देते. याच गच्चीवर आधारित लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांची निर्मिती असलेला ‘गच्ची’ हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गच्ची’वर आत्महत्या करायला चाललेल्या व्यक्तीला, ‘गच्ची’वरच आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन देणारा, हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे. अभय महाजन आणि प्रिया बापट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रमोशनल साँग लाँच करण्यात आले.
प्रिया बापट आणि अभय महाजन यांनी गायलेले प्रमोशनल साँग आपापल्या गच्चीबद्दल आपुलकी निर्माण करणारे आणि गच्चीवरच्या आठवणी ताज्या करणारे ठरत आहे. प्रियाच्या आवाजातील हे प्रमोशनल साँग तिच्या चाहत्यांना मोठी पर्वणी ठरत आहे. विशेष म्हणजे, अभयची गाण्याची हि पहिलीच वेळ असली तरी, प्रियासोबत गाताना त्यानेदेखील गाण्याची भरपूर मज्जा लुटली असल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हीडीयोमधून दिसून येते. प्रिया आणि अभय गात असलेला हा व्हिडियो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून, तरुणाईला नकळत ताल धरायला लावणा-या या प्रमोशनल साँगची खास स्टेपसुध्दा अभय आणि प्रियाने आपल्या व्हीडीओमार्फत लोकांपर्यंत पोहोचवली आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या ठेक्यावर प्रेक्षकसुद्धा थिरकताना दिसून येत आहे. ‘अनोळखी तू, मी आणि गच्ची’ या हटके गाण्याचे बोल ओमकार कुलकर्णी यांनी लिहिले आहे, तर अविनाश विश्वजीत यांनी ते संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अनोळखी असा शब्द जरी असला, तरी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या व्हीडीओमध्ये प्रिया, अभयची मस्तीवाली मैत्री दिसून येत असल्यामुळे हे साँगदेखील अगदी मजेशीर बनले आहे.
‘गच्ची’प्रेमींसाठी हे गाण त्यांच्या हृदयाला भिडणार असेल, परंतू ‘गच्ची’शी कधीच संबंध न आलेल्यांनादेखील ‘गच्ची’चा हेवा वाटू लागेल, असे हे गाणे आहे. आयुष्याची नवी वाट चोखाळणाऱ्या या गच्चीवर आधारित असलेला, नचिकेत सामंत दिग्दर्शित हा सिनेमा, ‘गच्ची’चे असेदेखील एक वेगळेपण आपल्यासमोर घेऊन लवकरच येत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात दडलेल्या पर्सनल स्पेसला विशेष महत्व निर्माण करून देईल, यात शंका नाही.