रत्नागिरी, (आरकेजी) : दापोली कृषी विद्यापीठातून सहलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाडीत गिम्हवणे या एकाच गावातील 7 जण होते. या 7 पैकी 4 जण तर एकाच वाडीतील होते. झगडेवाडीतील हे चौघेजण होते. या चौघांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण झगडेवाडीवर शोककळा पसरली आहे. आज या चौघांवर अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शनिवारी बस महाबळेश्वर नजीकच्या आंबेनळी घाटातील दरीत कोसळल्याच्या बातमी दापोलीत धडकली आणि अवघी दापोली सुन्न झाली. परंतु या अपघातामध्ये गिम्हवणे गावातील झगडेवाडीतील चार जण गेल्याने झगडेवाडीवर शोककळा पसरली आहे.
संतोष झगडे, सचिन झगडे, संजीव झगडे आणि संदीप झगडे अशी त्यांची नावं आहेत. हे चार तरुण गावच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये हिरहिरीने सहभागी होत असत. यातील संतोष झगडे व संजीव झगडे हे सख्खे चुलत भाऊ होते. संतोष हा कृषी विभागाच्या प्रशासकीय विभागात काम करत होता, तर संजीव हा कृषी विभागात लिपिक म्हणून काम कार्यरत होता. संतोषच्या पाठीमागे पत्नी, आई वडील, व दोन लहान मुली (एक दहा वर्षांची एक सात वर्षांची) असे कुटुंबीय आहेत. तर संजीवच्या पश्चात पत्नी, आई, एक लहान मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे. तर सचिन झगडे हा गिम्हवणे पंचक्रोशीत बाळा या टोपण नावाने ओळखला जात होता. तो कृषी विद्यापीठाच्या सामान्य शाखा विभागात कार्यरत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, लहान मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. तर संदीप झगडे हा कृषी विभागात वाहन चालक म्हणून काम करत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, व एक 8 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. शनिवारी सहा वाजेपर्यंत संतोष, संजीव आणि सचिन यांचे मृतदेह सापडले होते. त्यामुळे त्यांच्या मृतदेहाचे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून ते दापोली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र संदीपचा मृतदेह रात्री साडेअकरा पर्यंत शोध पथकाच्या हाती लागला नव्हता, त्यामुळे झगडे कुटुंबीयांनी मिळून आलेले तीनही मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात ठेवले होते, मात्र आज संदीपच्या मृतदेह सापडल्यानंतर सकाळी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर चारही मृतदेह गिम्हवणे- झगडेवाडीत नेण्यात आले.. आणि या चौघांवर अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी पी प्रदीप, शिवसेना युवानेते योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.