नवी दिल्ली : पुण्यातील एफटीआयआय म्हणजेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची निवड करण्यात आली. अनुपम खेर, गजेंद्र चौहान यांच्याकडून कार्यभार स्वीकारतील.
खेर यांनी या आपल्या चित्रपट कारकीर्दीत सुमारे 500 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. या क्षेत्रातल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना 2004 साली पद्मश्री आणि 2016 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळवले आहेत. अभिनय क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेअर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनुपम खेर यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये अभिनय केला असून 100 हून अधिक नाटकांमध्ये काम करुन त्यांनी रंगमंचावरही आपला ठसा उमटवला आहे. “ द बेस्ट थिंग अबाऊट यू इज यू” हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.
या आधी खेर यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून तसेच एनएसडी चे संचालक म्हणून काम केले आहे.