मुंबई : कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभर लॉकडाऊनची स्थिती आहे. अशा स्थितीत घरोघरी असणाऱ्या नागरिकांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष रविवार 5 एप्रिलपासून ‘मार्क्सवादाची तोंडओळख’ या विषयावर ऑनलाईन अभ्यासवर्ग सुरू करणार आहे.
जगातील सर्वांत जास्त प्रभाव असलेला तत्ववेत्ता हा कार्ल मार्क्स आहे. मार्क्सवादी तत्वज्ञान सोप्या मराठी भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्यांच्या ‘मार्क्सवादाची तोंडओळख’ या पुस्तकातून केलेला आहे. याच पुस्तकावर आधरित हा ऑनलाईन अभ्यासवर्ग सुरू होत आहे.
या अभ्यासवर्गात दररोज दुपारी 12 वाजता ‘मार्क्सवादाची तोंडओळख’ या पुस्तकातील एका प्रकरणाच्या वाचनाचा व्हिडिओ cpimaharashtrapage या फेसबुक पेजवर आणि यासंबंधात तयार करण्यात येणाऱ्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर पोस्ट केला जाईल.
हा व्हिडिओ पाहून सहभागींच्या काही शंका असल्यास त्यांनी आपले प्रश्न संबंधित व्हॉटस्ॲप क्रमांकावर सायंकाळी 5 वाजेपर्यंत विचारावेत.
सायंकाळी ठीक 8 वाजता या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक ज्येष्ठ विचारवंत कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, प्रा. डॉ. आनंद मेणसे, प्रा. डॉ. युगल रायलु, प्रा. डॉ. राम बाहेती या विषयाबाबतची विस्तारित मांडणी आणि आलेल्या प्रश्नांबाबत फेसबुक लाईव्हद्वारे शंकानिरसन करतील.
या ऑनलाईन अभ्यासवर्गात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली संमती 7057028666 या क्रमांकावर व्हॉटस्ॲपद्वारे कळवावी, अशी विनती भाकपने केली आहे.