नवनाथ मोरे, (लेखक पर्यावरण अभ्यासक आणि विद्यार्थी चळवळीशी जोडले गेले आहेत)
विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाला संपविण्याचा विडा उचलला आहे. विकासाचा बुलडोझर दररोज किमान २०० वनस्पती आणि कीटकांच्या प्रजाती नामशेष करत आहे.
विनाशाचा हा वेग असाच राहिला तर जीवसृष्टीच नष्ट होईल, असा इशारा युनोने दिला आहे. जीवसृष्टीचे महत्व आपण जाणत असलो तरी आपण तितकेच अज्ञानी आहोत, हे दिसून येत आहे. विकासाच्य नावाखाली चालवलेला विनाश पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आणत असेल तर असा विकास खरेच गरजेचा आहे का? याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. तापमानवाढ जगासमोर एक आव्हान राहिलेले असताना १६ वर्षाची स्वीडनमध्ये राहणारी ग्रेटा, हिच्यामुळे २० सप्टेंबर २०१९ रोजी जगभरातील लाखो मुले आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. १५ वर्षाची असताना हवामान बदलामुळे उदभवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मागच्या वर्षीपासून दर शुक्रवारी शाळा बुडवून ती स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन एकटी बसू लागली. हातात एक फलक असायचा की जगात ‘पर्यावरणीय आणीबाणी’ घोषित करा. परंतु सुरुवातीला तिच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही, पण हळूहळू ती लोकांच्या नजरेत येऊ लागली. अनेक जण तिला येऊन भेटू लागले. तेथील लोकंही तिच्यासोबत दर शुक्रवारी संसदेसमोर बसू लागले. जगभरात ग्रेटाची चर्चा व्हायला लागली, तिला सगळीकडून पाठिंबा मिळायला लागला, याची दखल घेत इंग्लंडने ‘पर्यावरणीय आणीबाणी’ घोषित देखील केली. तिच्या या आंदोलनाला २० सप्टेंबरला १ वर्ष पूर्ण झाले. आंदोलनाची दखल घेत जगभरात ‘२० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर’ जागतिक हवामान आठवडा म्हणून साजरा केला जात आहे.
जगभरातील १०० हून अधिक देशात २० सष्टेंबरला लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आपल्या देशात विविध राज्यांमध्ये या आंदोलनाला पाठिंबा दिला गेला. कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ मोहीमेला घेऊन मुलांनी ‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा,’ ‘झाडे लावा, झाडे जगवा, मानव वाचवा,’ प्रदूषणाचा धूर आणतो महापूर आदी घोषणा बरोबरच पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा केल्या. ग्रेटाचे आंदोलन जगभर पसरले आहे, यानिमित्ताने पर्यावरण प्रश्न पुन्हा जागतिक पटलावर आलेला आहे. तापमानवाढ थांबविणे गरजेची आहे, त्यासाठी कार्बन उत्सर्जन कमीत कमी ५० टक्क्यांनी कमी करावे लागेल. त्या दिशेने पाऊल उचवण्यासाठी आणि मानवाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाण्यासाठी ह्या आंदोलनाला दिशा मिळणे गरजेचे आहे.
ग्रेटा वस्तुस्थिती बदल बोलत आहे. जगामध्ये ती तापमानवाढीला घेऊन जनआंदोलन उभी करते आहे. संमेलन, राजकीय नेते यांच्याशी याबाबत बोलत आहे. ज्यात तिने “हवामान संकट” म्हणून वर्णन केलेल्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी त्वरित कारवाईचा आग्रह केला आहे. ग्रेटाने घरी आपल्या पालकांना हवाई प्रवास सोडणे आणि मांस न खाण्यासह जीवनशैली बदलली आहे. या चळवळीमुळे अनेकांना आपल्याला स्वत:ला या संकटातून वाचविण्यासाठीची जाणीव झाली आहे.
कोण कुठली ग्रेटा, विकसनशील देशातील दारिद्रय; शोषण याच्याबद्दल जागतिक आंदोलन का होत नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातील आणि जात आहे. परंतु या आंदोलनाकडे मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे म्हणून पहाणे जास्त उचित ठरेल. ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनात त्रुटी असतील, तिची समज तेवढी नसेलही. परंतु ज्या प्रश्नाबद्दल ती बोलत आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जगातील भांडवलदारी शोषणावर बोलणे गरजेचे आहे, येथील विषमतेवर बोलणे गरजेचे आहे. परंतु पर्यावरणाचा भांडवलदार कशा पध्दतीने विनाश करतात, मानवाने चंगळवादी जीवनशैली बदलून करणे गरजेचे आहे. हे ठणकावून सांगण्यासाठी आपण ह्या आंदोलनाला विधायक मार्गावर घेऊन जाणे गरजेचे आहे. ग्रेटाने सुरू केलेले आंदोलन भारताच्या परिपेक्षात कसे बसवायचे, त्याला कशा दिशा द्याची यावर चर्चा होणे गरजेचे आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चितपणे हे आंदोलन विधायक ठरेल. मानवाच्या शाश्वत लोकेंद्री सर्वांगिण विकासाकडे मार्गक्रमण करूयात!