मुंबई : मालाड येथे भिंत कोसळून २८ जणांच्य मृत्यूची घटना ताजी असतानाच आज पुन्हा मुंबईतील डोंगरी परिसरातील इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. केसरबाई सी- २५ नावाची चार मजली इमारत दुपारी पावणे बाराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. कित्येक जण ढिगार्याखाली गाडले गेल्याची शक्यता आहे. अग्निशमन दल व एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे. हा विभाग दाटीवाटीचा असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
तांडेल स्ट्रीटवरील या इमारतीत १५ कुटुंबे राहत होती. एका ट्रस्टची असणारी ही इमारत धोकादायक होती. पुनर्विकासासाठी विकासकाचीही नियुक्ती केली गेल्याची बोलले जात आहे. इमारतीला ए व बी वींग होती. ए विंग १९३४ साली, तर बीं- विंग १९८५ ला बांधली गेली. बी विंगच्या मागच्या बाजूचा कोसळलेला भाग अनधिकृत होता, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले. इमारतीची ए -विंग उपकरप्राप्त इमारत असून १०० वर्षापूर्वीची जुनी आहे.