नागपूर : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील माजी सरपंच रामदास करंदीकर यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात प्राप्त फिर्यादीवरुन गुन्हा दाखल असून चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली.
या प्रकरणी कुडाळ पोलीस स्टेशन येथे 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील 4 आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींसोबत गेलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदूर्ग येथील पोलीस उपनिरीक्षक यांना निलंबित करण्यात आले असून अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपायास निलंबित करण्यात आले आहे. यात काही कमतरता असेल तर अधिक चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.
सदस्य नितेश राणे यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता. तसेच गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सदस्य सुनील प्रभू यांनीही यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.