पणजी : पारंपरिक उपचारपद्धतींद्वारे लोकांना निरोगी ठेवण्याचे कार्य आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून होत आहे. राज्यात आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचारासाठीची संस्था झाल्यानंतर राज्यातील जनतेचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पेडणे तालुक्यातील धारगळ येथे आज अखिल भारतीय आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार संस्थेचा पायाभरणी सोहळा पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. उदघाटन सोहळ्यासाठी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, क्रीडा आणि पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांची उपस्थिती होती.
पारंपरिक उपचारपद्धतींच्या माध्यमातून विविध आजारांवर मात करता येते. बदलत्या जीवनशैलीमुळे उदभवणाऱ्या आजारांवर आयुष हाच प्रभावी तोडगा आहे, असे नाईक म्हणाले.
प्रस्तावित संस्थेत 250 खाटांचे रुग्णालय, ज्या माध्यमातून दरवर्षी पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीचे 500 विद्यार्थी शिक्षण घेतील. आयुर्वेदासाठी 100 खाटांचे रुग्णालय असेल. तर निसर्गोपचारासाठी 150 खाटांचे रुग्णालय आणि योग विभागात मधुमेह आणि ह्रदयासंबंधीच्या विकारांवर उपचार करण्यासाठी 30 खाटांची व्यवस्था असेल. प्रस्तावित संस्थेत डॉक्टरांसाठी 67 खोल्या आणि 182 विद्यार्थ्यांसाठी 91 खोल्या असतील. संस्थेच्या उभारणीसाठी एकूण 301 कोटी रुपयांचा खर्च नियोजित आहे. संस्थेत रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.