रत्नागिरी : कोकणातील गड-किल्ल्यांच्या दुरूस्तीची कामे वेगाने हाती घेण्यात आली आहेत. रत्नागिरीतील पूर्णगड, बाणकोट तर सिंधुदूर्गातील भरतगड, यशवंतगडांच्या दुरूस्तीची कोट्यावधींच्या निधीतून कामांना प्रारंभ झाल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे मूळ स्वरूपात जतन करून त्यांचे ऐतिहासिक महत्व कायम राखणे तसेच या किल्ल्यांच्या दुरूस्ती, संरक्षण-संवर्धन व देखभाल करण्यासाठी शासनाने पाऊले उचलली आहेत. त्यामुळेच आता गड-किल्ल्यांच्या दुरूस्तीच्या कामांना वेग आला आहे.महाराष्ट्राला समृध्द असा ऐतहासिक वारसा लाभला आहे. अशा ऐतिहासिक वारसांमधून आपल्याला येथील पराकमाची, लढवय्या बाण्याची ओळख पटते. राज्याच्या काना-कोपऱयात असलेले गड-किल्ले बघितले तर ही ओळख जास्त अधोरेखित होते. वर्षानुवर्षे अंगावर ऊन, वारा, पाऊस झेलत हे गड-किल्ले आजही सक्षमपणे उभे आहेत. मात्र छ. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी गाजवलेल्या पराकमाच्या गाथा मात्र काळाच्या ओघात आता या ऐतिहासिक गड-किल्ल्यांपैकी काही गड-किल्ल्यांची पडझड सुरु आहे. या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्याच्या दृष्टीने शासनाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी राज्य शासनाने गड-किल्ले संवर्धन समितीही नेमलेली आहे. आता शासनाकडून गड-किल्ल्यांच्या दुरूस्तीसाठी भरीव निधीचीही तरतुद करण्यात आली आहे. त्यातून कोकणातील गड-किल्ल्यांनाही नव्याने उभारी मिळण्यास मदत होणार आहे. रत्नागिरी व सिंधुदूर्गातील चार गड-किल्ल्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरीतील बाणकोट, पुर्णगड तर सिंधुदुर्गातील यशवंतगड, भरतगड यांच्या नुतनीकरणाच्या कामांना पारंभ झाला आहे. या चार गड किल्ल्यांच्या दुरूस्तीची कामे पुरातत्व विभागाच्या अखत्यारित शासनाकडून आलेल्या निधीतून केली जाणार आहेत. किल्ल्यांवरील ढासळलेली तटबंदी, बुरूज, तेथील साफसफाई करून या गड-किल्ल्यांना दुरूस्तीद्वारे नवा साज दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये पुर्णगड किल्ल्यासाठी ४ कोटी ८५ लाख, आणि बाणकोट किल्ल्याला सव्वाकोटीचा निधी मंजूर झालेला आहे. बाणकोट किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम ओसवाल कन्स्ट्रक्शन, सातारा, पूर्णगड किल्ला साईपेम कन्स्ट्रक्शन लातूर, भरगडाचे काम गायत्री कन्स्ट्रक्शन औरंगाबाद व यशवंतगडाचे काम त्रेवेणी कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर यांच्याकडून केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या गड-किल्ल्यांचे स्वरूप पूर्ववत होणार आहे. जेणेकरून इतिहासपेमी व पर्यटकांनाही या ऐतहासिक वारसा वैभवाची प्रचिती येण्यास मोलाची मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.