
ठाणे : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) च्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या प्रभारी प्रशासकीय समितीतर्फे प्रशिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मूलभूत प्रशिक्षण शिबिराची नुकतीच सांगता झाली. मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस घेण्यात आलेल्या या शिबिरात सुमारे २१ युवा, नवोदित प्रशिक्षक सहभागी झाले होते. भारताचा माजी गोलरक्षक दिनेश नायर , जेष्ठ फुटबॉलपटू मंगेश देसाई यांनी प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरात या युवा प्रशिक्षकांना अगदी लहान वयोगटातील फुटबॉलपटूना खेळायचे कसे, त्यांच्यामध्ये या खेळाविषयी गोडी कशी निर्माण करावी, खेळ आणि अभ्यास याची त्यांच्याकडून सांगड कशी घालायची, त्यांना शिस्तबद्ध खेळ कसा करायला लावायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
संघटनेत असलेल्या वादामुळे मागील ३७ वर्षे ठाणे जिल्ह्यात फुटबॉल खेळाला चालना मिळाली नव्हती. संघटनेत आपलेच वर्चस्व असावे यामुळे निर्माण झालेल्या वादाने कधी न्यायालयाची पायरी गाठली हे कळले हि नाही. पण त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील फुटबॉलपटूचे मोठे नुकसान होत आहे याची चिंता कोणालाच नव्हती. अव्वल दर्जाचे स्पर्धात्मक फुटबॉल खेळायला मिळावे म्हणून ठाणे जिल्ह्यातील फुटबॉलपटू शेजारील मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर जिल्ह्यातील फुटबॉल संघाचा आसरा घेत होते. खेळाडूंची होत असलेली हि परवड आणि जिल्ह्यातील फुटबॉलपटूना न्याय देण्यासाठी अखेर या खेळाची राज्यातील पालक संघटना असलेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) ने पुढाकार घेतला. ठाणे जिल्ह्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी, इतर शहराप्रमाणे ठाणे जिल्ह्यातहि फुटबॉलचे सामने खेळवून राज्य अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व होण्याकरता विफाने इतर गोष्टी बाजूला ठेवून ठाणे जिल्ह्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय समितीची स्थापना केली आणि या समितीला ठाणे जिल्ह्यात सामने, रेफ्री, प्रशिक्षकासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यास सांगितले आहे. प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभास विफाचे सचिव सौतुर वाझ, विफा ठाणे जिल्हा प्रभारी प्रशासकीय समितीचे प्रमुख प्यारेलाल चौधरी, समन्वयक सायमन पात्रोव्ह उपस्थित होते. समितीतर्फे खेळाडू आणि प्रशिक्षकासाठी प्रथमोपचार शिबीर, रेफ्री मार्गदर्शन शिबीर आणि पहिल्या ठाणे जिल्हास्तरीय वरिष्ठ गटाच्या साखळी सामन्यांचे आयोजन पुढील महिन्यात करण्यात येणार आहे.