मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ‘सर्व्ह सेफ फूड’ या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठीच्या मोबाईल व्हॅनचे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नव्या वाहनांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विधानभवन परिसरात झाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, नेस्ले इंडियाच्या संचालक स्वाती पिरामल, व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन, नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रिट वेंडर्स (नास्वी) चे समन्वयक अरविंद सिंह आदी यावेळी उपस्थित होते. श्री. बापट यांनी प्रास्ताविक केले.
अन्न व औषध प्रशासन व नेस्ले इंडिया यांच्यामार्फत नास्वीच्या सहकार्याने राज्यातील सुमारे ३६०० खाद्यपदार्थ विक्रेत्यांना चांगले, स्वच्छ व आरोग्यदायी अन्न पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विक्रेत्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही याद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या नव्या पोशाखाचे अनावरणही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व्ह सेफ फूड अंतर्गत देशातील पाच हजार विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाने नव्याने खरेदी केलेल्या वाहनांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, चांगले आरोग्यदायी खाद्यपदार्थ हवे असतील तर या विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षणासाठी मोबाईल व्हॅन उपयुक्त ठरणार आहे. यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अन्न व औषध प्रशासन, नेस्ले इंडिया यांचे त्यांनी अभिनंदन केले.