तुम्ही दररोज व्यायाम करता का? संतुलित आहाराचे सेवन करता का? तुम्ही भरपूर पाणी पिता का? तुम्ही तुमची झोप पूर्ण करता का? नाही…तर,तुम्हाला लवकरच या सवयी लावून घ्याव्या लागतील. निरोगी आरोग्याची हिच गुरुकिल्ली असून या सवयींमुळे आजारांपासून लांब राहणे शक्य होते. तर आजपासून या चांगल्या सवयी आचरणात आणा आणि निरोगी रहा.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. चूकीच्या सवयींमुळे शारीरीक व्याधींना आमंत्रण न देता निरोगी जीवनशैलीचे पालन करा. जीवनशैली बदलणे शक्य नसले तरी आहार आणि व्यायाम यांमध्ये आवश्यक बदल करूनही उत्तम आरोग्य राखता येते.
परंतु, तुम्हाला माहित आहे की निरोगी आयुष्य जगण्यासाठी तासनतास जीममध्ये व्यायाम करणे, फक्त उकडलेल्या भाज्या, द्रवपदार्थांचे सेवन करणे नव्हे तर दैनंदिन जीवनात चांगल्या सवयींचे पालन करत शरीराला पोषक आहाराचे सेवन, पुरेशी झोप, ताणतणापासून दूर राहणे या गोष्टींनाही तितकेच जास्त महत्त्व आहे. शरीराबरोबरच मनाचे स्वास्थ जपणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
निरोगी आरोग्यासाठी खालील गोष्टींचे नक्कीच पालन करा
व्यायामाला प्राधान्य द्या – आपली शरीरयष्टी आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी दैनंदिन वेळापत्रकात व्यायामासाठी विशिष्ट अशी वेळ निश्चित करा. कोणत्याही परिस्थितीत व्यायाम करणं टाळू नका. नियमित व सुयोग्य व्यायाम असल्यास निरोगी, दीर्घकालीन, सुदृढ आरोग्य लाभते. स्नायू बळकट ठेवण्यासाठी आणि हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी तसेच सुडौल बांध्यासाठी व्यायामाचा पर्याय हा महत्त्वाची भूमिका बजावतं.आपले हृदय बळकट करण्यास रक्ताभिसरण वाढविण्यास व्यायामाने नक्कीच फायदा होतो. व्यायामाने आपले वजन नियंत्रित करण्यास, मानसिक स्वास्थ चांगले राखण्यास मदत होते. व्यायामामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी योग्य राखण्यास मदत करेल. लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन व्हिडिओंच्या आधारे देखील अनेक व्यायाम प्रकार केले जाऊ शकतात.
भरपूर पाणी प्या : तुम्हाला बर्याचदा सतत डिहायड्रेट झाल्यासारखे वाटते का? आपल्याला थकवा जाणवतो का? मग आपण पुरेसे पाणी पित नसल्याची ही लक्षणे आहेत. असे करणे टाळा! आपल्या शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यावाटे शरीरातून विषारी पदार्थ आणि बाहेर टाकले जाते. पाण्यामुळे शरीरातील ऑक्सीजनची कमतरताही पूर्ण करता येते. तुला माहित आहे काय? आपले शरीर लघवी, घाम आणि श्वासोच्छवासाद्वारे पाणी बाहेर टाकत असते. दिवसभर जितके शक्य असेल तितके पाणी प्या पण ओव्हरहाइड्रेशन टाळा.
शांत आणि पुरेशी झोप घ्या : रात्री उशीरापर्यंत जागरण करता का? तुम्ही पुरेशी झोप घेत नाही का? मग हे तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. अपुरी झोप ही लठ्ठपणा, औदासिन्य किंवा हृदयविकाराचा धोका वाढवू शकते. यामुळे एकाग्रतेचा अभाव आणि स्मरणशक्ती संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून, झोपेचे योग्य वेळापत्रक आखा. झोपण्यापूर्वी टेलीव्हिजन पाहणे किंवा कॅफेनयुक्त पेये पिणे टाळा कारण त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो.
संतुलित आहाराचे सेवन करा आणि निरोगी रहा: आपल्या आहारात पोषक पदार्थांचा समावेश करा. आपल्या आहारात तंतुमय पदार्थांचे सेवन वाढवा तसेच बेरी, संत्री, शेंगदाणे आणि सुकामेवा, सोयाबीन, डाळी आणि ब्रोकोली आणि गाजर या भाज्या खा. तंतुमय पदार्थांमुळे पित्ताचा त्रास, जळजळ आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. शिवाय आपल्याला बद्धकोष्ठता सारख्या समस्येपासून दूर राहणे शक्य होते. आहारात मीठाचे सेवन कमी करा कारण त्यामुळे उच्च रक्तदाबासारख्या समस्या उदभवू शकतात. साखरेचे प्रमाण अधिक असलेली पेय टाळा. आपले रोजचे जेवण टाळू नका.
आपण काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत तज्ञांचा सल्ला घ्या. गरज नसताना अन्नाचे सेवन करू नका. मद्यपान आणि धूम्रपान करण्याचे टाळा. घरी शिजविलेल्या अन्नाचे सेवन करा.
ध्यान करणे फायदेशीर : मानसिक स्वास्थाकरिता ध्यान करणे, मनाचे स्वास्थ जपताना तणावापासून दूर राहणे गरजेचे आहे. दररोज असे केल्याने नैराश्य, कमकुवत मानसिक आरोग्य, नकारात्मकतेवर मात करून सकारात्नक व आनंदी आयुष्याकडे वाटचाल करणे शक्य होते. तसेच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलता येऊ शकतो.
मौखिक समस्यांपासून दूर रहा : दिवसात दोनदा दात घासा आणि शक्य असल्यास तेव्हा दंतचिकित्सकांच्या मार्दर्शनाने वेळोवेळी तपासणी करा
घरी रहा आणि सुरक्षीत रहा – सद्यस्थितीत सुरु असलेल्या कोरोना व्हायरससारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी घराबाहेर पडणे टाळा. स्वच्छतेचे पालन करा तसेच स्वसंरक्षणासाठी आवश्यक त्या उपायाचा अवलंब करा.
- डॉ. मंजुषा अग्रवाल, इंटरनर मेडिसिन कन्सलटंट, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई