रत्नागिरी (आरकेजी): इंधनांच्या वाढत्या किमतींचा फटका मच्छिमारांनाही बसतो आहे. यामुळे संतप्त झालेल्या मश्चिमार बांधवांनी नौका किनाऱ्याला लावून भारत बंदच्या आंदोलनात सहभाग घेतला. सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन हर्णे बंदर परिसर दुमदुमून सोडला.
वाढत्या डिझेलच्या किमतींमुळे हर्णे बंदरातील मच्छीमारांचा डिझेलचा खर्च देखील सुटणे मुश्किल झाले. डिझेलसहित इतर सर्व खर्च मच्छीमारांच्या अंगावरच पडला आहे. त्यातच सरकारनं डिझेलचे दर वाढवले आता मात्र कुठून एवढा पैसा उभा करायचा असा प्रश्न या मच्छीमारांपुढे पडला आहे. हा डिझेल दर कमी करण्यासाठी भारत बंदचे आंदोनल छेडण्यात आले आहे. या आंदोलनात स्थानिक मच्छीमारबांधवानी सहभाग नोंदवला. दरम्यान, नौका हर्णै बंदरात आणून उभ्या केल्या होत्या आणि ” डिझेल दर कमी करा , नाहीतर खुर्च्या खाली करा”, अशा घोषणा बंदर परिसरात देण्यात आल्या. तसेच इंधन दरवाढीच्या निषेधाचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. यावेळी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व पदाधिकारी व सर्व मच्छीमार बांधव उपस्थित होते.
सरकारने केलेल्या डिझेल दर वाढीविरोधात एक दिवस मासेमारी बंद ठेऊन तीव्र निषेध नोंदवला आहे. डिझेल दर कमी करणे गरजेचे आहे. कारण एकीकडे मासळीचे दर घटत असताना दुसरीकडे डिझेलच्या किंमती वाढत आहेत. यात मश्चिमार भरडून निघत आहेत. सरकारने याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मच्छीमारांची मागणी आहे असे दापोली मंडणगड गुहागर मच्छीमार संघटनेचे सदस्य- सोमनाथ पावसे यांनी सांगितले.