रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : मासेमारीवर असलेल्या बंदीचा कालावधी समाप्त झाला आणि आजपासून मासेमारीला सुरूवात झाली. दोन महिन्यांनी जिल्हय़ातील हजारो मच्छीमार नौका समुद्रावर स्वार झाल्या. पर्सेसीन नौका वगळता पारंपारिक मच्छिमारांना आजपासून मासेमारी करता येणार आहे. बंदी उठल्याने किनारपट्टीवरील बंदरात मच्छिमारांची लगबग पहायला मिळत होती. सध्या समुद्रातील वातावरण चांगली मासळी मिळण्याचे संकेत देत असल्यानं अनेक मच्छिमारांनी आज मासेमारीला आपल्या बोटी समुद्रात ढकलल्या. तर नौकांवर काम करण्यासाठी परराज्यातून मोठ्या प्रमाणात खलाशी दाखल झालेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 40 बंदरे आहेत. या सर्व बंदरामध्ये मासेमारी बंद होती. या बंदीचा कालावधी मंगळवारी संपला असून आजपासून नव्या मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान पर्ससीन नौकांवर राज्य शासनाने फेब्रुवारी 2016 पासून निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे पर्ससीन बोटीचा मासेमारीचा हंगाम 1 महिना उशिराने सुरू होणार आहे.