मुंबई, (निसार अली) : केंद्र सरकारच्या नौकानयन वाहतूक मंत्रालय ( डी.जी.शिपींग) यांच्या माध्यमातून सागरमाला योजनेंतर्गत शिपींग व्यापारी जहाजाकरिता जख्यू, गुजरात ते कन्याकुमारी, तमिळनाडु सागरी क्षेत्रात 12 ते 35 नॉटीकल मैल परिसरात समुद्रामध्ये प्लॉट टाकून सागरीरस्ता राखीव करून सदर क्षेत्रात मासेमारी करण्यास प्रतिबंध करण्याचा अन्यायकारक निर्णय घोषित केला आहे. या निर्णयाचा मच्छिमार संघटनांनी विरोध केला आहे. तसेच 30 अॉक्टोंबर रोजी सकाळी 11.00 वाजता ससून डॉक बंदरामधून मासेमारी नौकांनी सागरी मोर्चाने शिपींग जहाजांचा रोको करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती ( MMKS) चे कार्यध्यक्ष रामकृष्ण तांडेल, यांच्या अध्यक्षतेखाली मच्छिमार सर्वाेदय सहकारी संस्था, कफ परेड येथील सभागृहात मच्छिमार संस्थांच्या पदाधिका-यांचा रविवार 21 अॉक्टोंबर रोजी सभा झाली. सभेमध्ये नँशनल फिशवर्क्स फोरम (NFF) ने 6 अॉक्टोंबर रोजी गोवा राज्यात झालेल्या निर्णयानुसार दिनांक 30 अॉक्टोंबर रोजी जहाजांचा रोको करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये अंदाजे 450 ते 500 मासेमारी नौकांनी घेराव घालून सरकारला सदर कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ससून डॉक बंदरामध्ये जाहीर सभेत रूपांतर होईल. तसेच दिवशी मासळी मार्केट, मासळी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय ही या संघटनांनी घेतला आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणा-या डिझेल पेट्रोल दरवाढीमुळे मच्छिमार हवालदिल झाला आहे. देशात किमान 2,50,000 नौका तर राज्यात सुमारे 19,000 च्या वर मासेमारी नौका कार्यरत असून मासेमारी करणारे व त्यावर अवलंबून असलेले 10 कोटी जनतेचे सदर फ्री वे शिपींग कॉरिडॉरमुळे उदरनिर्वाह धोक्यात येईल. आताच मासेमारी क्षेत्र कमी पडत असल्यामुळे मासेमारांमध्ये वाद निर्माण होत आहेत. गुजरात ते तमिळनाडुपर्यंत 40 मीटरचे क्षेत्र शिपींग कॉरिडॉरसाठी राखीव ठेवल्यास मच्छिमार उद्ध्वस्त होईल. यामुळे केंद्र सरकारच्या सदर प्रस्तावाला तीव्र विरोध होत आहे. या सभेला एमएमकेएसचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष मोरेश्वर पाटील, सचिव ,मोरेश्वर वैती करंजा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा, सचिव गणेश नाखवा, मार्टंड मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष अमोल रोगे, मरोळ मासे विक्री संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी, ज्येष्ठ मच्छिमार नेते दिलीप पागधरे, मच्छिमार सर्वाेदय संस्थेचे अध्यक्ष प्रविण तांडेल, उपाध्यक्ष भास्कर तांडेल, मल्हारी रेवस मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष विश्वास नाखवा, एमएमकेएसचे मुंबई अध्यक्ष परशुराम मेहर, लक्ष्मण बेडेकर, जयेश भोईर, दांडा मच्छिमार संस्थेचे अशोक कुट्टेवाला, कैलास तेली इत्यादी उपस्थित होते.